esakal | महाराष्ट्र-तेलंगणाचे प्रेमबंध जोपासणाऱ्या पोडसा सेतुला लागलेय एकटेपणाचे ग्रहण
sakal

बोलून बातमी शोधा

podasa

दोन्ही राज्यातील नागरिकांचे आपुलकीचे नाते या पुलाने अधिक घट्ट केले. जिल्ह्यातील दारूबंदी नंतर तेलंगणातील सिरपूर तळीरामांसाठी " पंढरी " ठरले होते. विविध कामे घेऊन दोन्ही राज्यातील नागरिक सीमोल्लंघन करतात. नेहमी वर्दळ असणाऱ्या पोडसा पुलावर हल्ली शुकशुकाट आहे.

महाराष्ट्र-तेलंगणाचे प्रेमबंध जोपासणाऱ्या पोडसा सेतुला लागलेय एकटेपणाचे ग्रहण

sakal_logo
By
संदीप रायपुरे

गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र-तेलंगणा दोन वेगवेगळ्या परंपरा जपणारी राज्ये. वर्धा नदीने या राज्यांच्या सीमा निर्धारित केल्या. पण या सीमा दोन्ही बाजूंच्या गावातील आपुलकीच्या, प्रेमाच्या संबंधाला रोखू शकल्या नाहीत. मात्र कोरोनाचे सावट आले अन सारेच थांबले. सीमा सील झाल्यात. ही आंतरराज्यीय सीमाही याला अपवाद नाही. इथले रोटीबेटीचे व्यवहारही थांबले. तळीरामांचीही पंचाईत झाली. एरवी दोन्ही राज्याचे आपुलकीपूर्ण संबंध जोपासणारा पोडसा पूल आता मात्र ओस पडला आहे. नेहमी वर्दळ असणाऱ्या या पुलावर हल्ली शुकशुकाट आहे. स्मशानशांतता आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटचा टोकावर असलेल्या गोंडपिपरी तालुक्‍यातील पोडसा पूल महाराष्ट्र-तेलंगणाचा ऋणानूबंध जोपासणारा सेतू ठरला आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांचे आपुलकीचे नाते या पुलाने अधिक घट्ट केले. जिल्ह्यातील दारूबंदी नंतर तेलंगणातील सिरपूर तळीरामांसाठी " पंढरी " ठरले होते. विविध कामे घेऊन दोन्ही राज्यातील नागरिक सीमोल्लंघन करतात. नेहमी वर्दळ असणाऱ्या पोडसा पुलावर हल्ली शुकशुकाट आहे.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर देश टाळेबंद झाला. प्रांत,जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. व्यवहार ठप्प पडले. याचा फटका सीमावर्ती भागाला सर्वाधिक बसला. तेलंगणातील सिरपूर, कवठाळा या दोन मोठ्या बाजारपेठा आहेत. या बाजारपेठेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील लघू व्यावसायिक विविध वस्तू विक्रीला नेत असतात. हे दोन्ही बाजार स्वस्त असल्याने सीमावर्ती भागातील नागरिक गर्दी करतात. दुसरीकडे तेलंगणातील व्यापारी जिल्ह्यात येत असतात. टाळेबंदीमुळे सीमा बंद असल्याने दोन्ही राज्यातील लघू व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मराठी,तेलगू भाषेचे असेही नाते....!
तेलंगणातील सीमावर्ती भागात मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. मायबोली तेलगू असतानाही सीमावर्ती भागातील खेड्यापाड्यात मराठी भाषेचा गोडवा बघायला मिळतो. तर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तेलगू भाषा बोलली जाते. दोन्ही राज्यातील नागरिकांत रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याने भाषेचेही देवाणघेवाण झाली आहे. देशात भाषा वादाने टोक गाठलेले असताना महाराष्ट्र-तेलंगणातील सीमावर्ती भागात मराठी आणि तेलगू भाषेचे प्रेमाचे नाते दिसून येते.

सविस्तर वाचा - तुमचे मुंढे तर आमचे डॉ. उपाध्याय, सोशल मीडियावर रंगतोय हा सामना
विवाहसोहळ्यांना फटका
सीमावर्ती भागात रोटीबेटीचे व्यवहार होतात. दरवर्षी दोन्ही राज्यातील मुलामुलींची लग्नगाठ मोठ्या संख्येत बांधली जाते. मात्र यावर्षी केवळ एकच विवाह सोहळा पार पडू शकला. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका विवाहसोहळ्यांना बसला आहे.

loading image