दोन कोंबडीचोरांनी रात्रीतून उडविल्या सत्तर कोंबड्या... नंतर अशी झाली फसगत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

चोरट्यांनी सत्तर कोंबड्या चोरल्यानंतर काही कोंबड्यांवर ताव मारला. काही दिवसांची सोय झाल्याचा आनंद त्यांचा चेहऱ्यावर होता. मात्र, ऐवढ्या मोठ्या कोंबड्या सांभाळायच्या कशा, असा प्रश्‍नही त्यांच्यासमोर होता. याचा विचार करीत असताना त्यांनी कोंबड्या विकण्याचा प्रर्याय शोधला. हाच पर्याय त्यांच्या अंगलटी आला. कोंबड्या चोरणाऱ्यांच्या शोधात असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

चंद्रपूर : सध्या देशात करोनाची दहशत पसरली आहे. चिनमध्ये करोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आपल्याला करोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केली जात. नागरिक घराबाहेर निघताना मास्त लावत आहेत. दुसरीकडे चिकन खाल्यांने करोना होतो अशी अफवा सोशल मीडियावर पसरवली जात आहे. नागरिक दहशतीत असल्यामुळे चिकनची विक्री कमी झाली आहे. अशात तब्बल सत्तर कोंबड्या चोरी गेल्याने विक्रेत्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीने क्षणभर पोलिसही चक्रावून गेले होते. "करोना'ची दहशत संपविण्यासाठी कोंबड्यांची चोरी केल्याचे नागरिक गमतीत एकमेकांना म्हणत होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावरील इंदिरानगर परिसरात साबीर अली जुम्मन अली यांच्या मालकीचे मुल्लाजी चिकन सेंटर आहे. या सेंटरमधून ते कोंबडी विक्रीचा व्यवसाय करतात. ते नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता. 27) दुकानात आले असता धक्काच पोहोचला. त्यांच्या दुकानातून बॉयलरच्या 30 आणि गावठी प्रजातीच्या तब्बल 40 कोंबड्या चोरट्याने लंपास केल्या होत्या. अली यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. क्षणभर पोलिसांनाही यावर विश्‍वास बसला नाही. कारण, सोने, चांदी आणि रोकड लुटण्यासाठी घरफोडीच्या घटना शहरात नित्याच्याच झाल्या आहे. मात्र, कोंबडी चोरीची तक्रार पहिल्यांदाच त्यांच्याकडे आली. तरीही त्यांनी तक्रार दाखल केली. 

क्लिक करा - शेतकऱ्यांनो, तुम्हाला सोडणार नाही! मी पुन्हा येईल...

दुसरीकडे चोरट्यांनी सत्तर कोंबड्या चोरल्यानंतर काही कोंबड्यांवर ताव मारला. काही दिवसांची सोय झाल्याचा आनंद त्यांचा चेहऱ्यावर होता. मात्र, ऐवढ्या मोठ्या कोंबड्या सांभाळायच्या कशा, असा प्रश्‍नही त्यांच्यासमोर होता. याचा विचार करीत असताना त्यांनी कोंबड्या विकण्याचा प्रर्याय शोधला. हाच पर्याय त्यांच्या अंगलट आला. कोंबड्या चोरणाऱ्यांच्या शोधात असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रवीण हंडी आणि बाळा आमले असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासाअंती चोरटे कोठडीत आणि कोंबड्या खुराड्यात परतल्या. 

मोबाईल क्रमांकावरून गवसले

प्रवीण आणि बाळा यांनी कोंबड्याची चोरी केल्यानंतर विक्री करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी शहरातील कोंबडी विक्रेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या व आमच्याकडे विक्रीसाठी कोंबड्या आहे, असे सांगत सुटले. मात्र, एवढ्या संख्येतील कोंबड्या एकाचवेळी घेण्यास कुणीही तयारी दर्शवली नाही. एका कोंबडी विक्रेत्याने त्यांचा क्रमांक घेतला. पैशाची जुळवाजुळव झाली की संपर्क करतो, असे आश्‍वस्त केले. दरम्यान शहरातील कोंबडी विक्रेत्यांमध्ये कोंबडी चोरी प्रकरणाची चर्चा झाली. तेव्हा कोंबडी विकण्यासाठी दोन युवक आल्याची माहिती समोर आली. त्यातील एकाने भ्रमणध्वनी क्रमांक अलीला दिला. अलींनी दुसऱ्या नावाने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते युवक इंदिरानगर येथीलच असल्याचे समोर आले.

जाणून घ्या - देशीकट्ट्यातून सुटल्या गोळ्या...पैशांसाठी होता वाद

चोरट्यांना जामिनाची, मालकाला ग्राहकांची प्रतीक्षा

अली यांना कोंबडी चोरणारे हेच युवक असल्याचे समजताच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी प्रवीण हंडी आणि बाळा आमले यांना ताब्यात घेतले. आपल्या पद्धतीने विचारपूस केली असता दोघांनीही कोंबड्या चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून शिल्लक कोंबड्या ताब्यात घेतल्या आणि मुल्लाजी चिकन सेंटरला परत दिल्या. सध्या प्रवीण अणि बाळा कोठडीत जामिनाच्या आणि कोंबड्या खुराड्यात ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrest two thieves in Chandrapur district