गेली १५ वर्षं दारूबंदी असलेल्या गावात सर्रास विकत होती दारू; अखेर पोलिसांनी आवळल्या अंगणवाडी सेविकेच्या मुसक्या 

Police arrested woman who selling wine in gadchiroli district
Police arrested woman who selling wine in gadchiroli district

आरमोरी (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील मोहझरी येथील मुक्‍तिपथ गाव संघटन, पोलिस पाटील व तंटामुक्‍ती समितीच्या पुढाकारातून दारूविक्रेत्या महिलेवर आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे दारूविक्रेती महिला अंगणवाडी सेविका असून कायदेशीर कारवाईपासून नेहमी दूर असायची. अखेर २ लिटर मोहफुलाच्या दारूसह पोलिसांनी तिला पकडले आहे. कुंदा भानारकर असे त्या महिलेचे नाव आहे.

मोहझरी या गावाने १५ वर्षे ‘दारूबंदी असलेले गाव’ म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून मुजोर दारूविक्रेत्यांनी छुप्या मार्गाने दारूविक्री सुरू केली. त्यामुळे घरात वाद-विवाद वाढले. गावाची दुर्दशा बघून मुक्‍तीपथ गाव संघटन, पोलिस पाटील व तंटामुक्‍ती समितीने वेळोवेळी दारूविक्रेत्यांना सूचना देऊन, कायद्याचा धाक दाखवून दारूविक्री बंद करण्याचे आवाहन केले. परंतु आवाहनाला न जुमानता दारूविक्रेत्यांनी दारूविक्री सुरूच ठेवली. 

गावात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या कुंदा भानारकर या महिलेनेही दारूविक्री सुरू केली. गाव संघटनेच्या महिलांनी तिला वारंवार समजावले. तिच्या घराची तपासणी करण्यासाठी गेले असता महिलांनाच ती धमकावत असे. तिने नवनवीन शक्कल लढवीत गावकऱ्यांना त्रस्त केले होते. त्यामुळे संतप्त गावकरी, गाव संघटनेच्या महिला, पोलिस पाटील व तंटामुक्‍ती समितीच्या सदस्यांनी कुंदा भानारकर हिच्या घरातून २ लिटर मोहफुलाची दारू पकडून पोलिसांना बोलावले. आरमोरी पोलिसांनी पंचनामा करून त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी गावातील इतर दारूविक्रेत्यांना दिली आहे. यावेळी पोलिस पाटील तुळशीदास वाढई, दारूबंदी संघटनेचे सचिव सुधाकर निकुरे, गावसंघटनेच्या महिला, तंटामुक्‍ती समितीचे सदस्य उपस्थित होते.

अंगणवाडीसेविका पदावरून खाली करा

दारूविक्री करणारी अंगणवाडी सेविका उद्याचे भविष्य काय घडवणार, मुलांवर काय परिणाम होतील, असा विचार करून गावातील माता-पालक आपल्या चिमुकल्यांना अंगणवाडीत पाठविण्याचे टाळत आहेत. या दारूविक्री करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला वारंवार सांगून सुद्धा तिने आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. या महिलेला अंगणवाडी सेविका पदावरून खाली करा, अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.

दारूविक्रेत्यांना कठोर शिक्षा करू  

मोहझरी येथील दारूबंदीची अंमलबजावणी करणार. दारूविक्रेत्यांच्या विरोधात असलेले पंच व साक्ष प्रामाणिक व मजबूत असल्यास नक्कीच दारूविक्रेत्यांना देखील कठोर शिक्षा होऊ शकते. आपण तुमच्या पाठीशी असून दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन आरमोरीचे ठाणेदार सूर्यवंशी यांनी मोहझरी येथील महिलांना दिले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com