पोलिसांमध्येच हाणामारी, काय झालं असेल?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

> एकमेकांना पायताणाने हाणले 
> जिल्हा रुग्णालयासमोरील घटना 
> तिसऱ्या पोलिसानेसुद्धा केला हात साफ 

भंडारा : खर्रा हा मित्र बनवतो!, वैरीलाही सोबत आणण्याचे काम करतो, खर्रा देऊन आपले काम काढले जाऊ शकते, अशी चर्चा खर्रा खाणारा आणि न खाणाऱ्यामध्ये होत असते. जणू ते खर्राचे गुणगाणच करीत असतात. तसेच दुसऱ्यांना खर्रा खाण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करतात. मात्र, याच खर्रावरून पोलिसांमध्ये हाणामारी झाली असे म्हटले तर? होय हे खरं आहे.. विश्‍वास बसत नाही ना? दोन पोलिसांनी एकमेकांना चपलने झोडले. ही घटना विदर्भातील भंडारा जिल्ह्यात घडली. 

सोमवारी सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास पोलिस मुख्यालयातील तीन पोलिस कर्मचारी आरोपी कैद्यांची तपासणी करण्यासाठी पोलिस वाहनांतून जिल्हा सामान्य रुग्णालयात आले होते. तपासणी झाल्यानंतर बाहेर चहापानासाठी थांबले होते. तिघांपैकी एका पोलिसाने आरोपीला खर्रा दिला. आरोपीला खर्रा देण्याचा प्रकार खटकल्याने तसेच नियमभंग केल्यावरून दुसऱ्या पोलिसाने त्या कर्मचाऱ्याला हटकले. 

परंतु, काहीही ऐकूण घेण्याच्या तयारीत नसणाऱ्या खर्रा देणाऱ्या पोलिसाने शिवीगाळ सुरू केली. दोघांत शाब्दिक बाचाबाची होऊन या वादाचे पर्यवसान चक्क हाणामारीत झाले. दोघांनी चक्क रुग्णालयासमोर एकमेकांना ठोसे लगावले. चपलेनेसुद्धा मारहाण केली. तिसऱ्या पोलिसानेसुद्धा खर्रा देणाऱ्या पोलिसावर हात साफ केले. कायदा, शांतता, सुरक्षा, सुव्यवस्था व सामाजिकतेचे भान राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. 

आपण सार्वजनिक ठिकाणी काय करतो आहे. याचे साधे भानही त्यांनी ठेवले नाही. या दोघांमध्ये पोलिस गाडीच्या चालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला न जुमानता पाच मिनीटे त्यांची फ्रिस्टाईल रंगली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील आवारात घडलेल्या या घटनेची एकच खमंग चर्चा रंगली होती. मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलवर व्हायरल झाला असून, सार्वजनिक ठिकाणी शोभा दाखविण्याच्या याप्रकारामुळे त्या पोलिसांवर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

लोकांचे मनोरंजन 
दोन पोलिसांत रंगलेला हा सामना पाहण्यासाठी नागरिकांनी सभोवताल गर्दी केली होती. त्यातील काहींनी मोबाईलवरून चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल केला. जनतेचे रक्षकच जर अशा प्रकारची कृती करीत असतील तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवावी, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होते. पोलिसांच्या अशा खुलेआम सुरू असलेल्या फाईटमुळे अनेकांनी मनोरंजन करून घेत तोंडसुख घेतले. 

पूर्वीही झाले भांडण 
खुलेआम माहरण झाल्याने पोलिसांवर पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. कैद्याला खर्रा देणाऱ्या पोलिसाचे यापूर्वीसुद्धा अनेकांशी भांडण झाल्याची माहिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police attacked each other, What happened?