पोल्ट्री फार्म संचालकाविरोधात पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

हिंगणा (जि.नागपूर) : तालुक्‍यातील दाभा आगरगाव येथील वलनी लघुसिंचन तलावात मृत कोंबड्यांचा खच आढळून आला. "दै. सकाळ'मध्ये वृत्त प्रकाशित होतात सर्वत्र खळबळ उडाली. आरोग्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ग्रामपंचायत प्रशासन व लघुसिंचन विभागाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हिंगणा (जि.नागपूर) : तालुक्‍यातील दाभा आगरगाव येथील वलनी लघुसिंचन तलावात मृत कोंबड्यांचा खच आढळून आला. "दै. सकाळ'मध्ये वृत्त प्रकाशित होतात सर्वत्र खळबळ उडाली. आरोग्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ग्रामपंचायत प्रशासन व लघुसिंचन विभागाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दाभा आगरगाव ग्रामपंचायतअंतर्गत गावालगत काळे यांच्या मालकीचे पोल्ट्री फार्मचे तीन शेड आहेत. यातील एका शेडमध्ये कुक्‍कुटपालन सुरू आहे. याच शेडमधील कोंबड्यांचा मृत्यू झाला. मृत कोंबड्यांची विल्हेवाट योग्यरीतीने न लावता वलनी तलावात काही कोंबड्या फेकण्यात आल्या तर गावाशेजारीही काही कोंबड्या टाकण्यात आल्या. ही बातमी प्रसारित होताच प्रशासनाला खडबडून जाग आली.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांनी दाभा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश मडावी यांना घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. ग्रामसेवक विशाल चव्हाण यांनीही पोल्ट्री फार्म व तलावाशेजारी भेट देऊन पाहणी केली.24 सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल तयार केला. डॉ. मडावी यांनी अहवाल तयार करून ग्रामपंचायत प्रशासनाकडे दिला. या अहवालात मृत कोंबड्या तलावात टाकण्यात आल्याची नोंद केली आहे. तसेच पोल्ट्री फार्ममधील शेडमध्ये ही मृत कोंबड्या दिसून आल्या. या कोंबड्या साधारणतः सात ते आठ दिवसांपूर्वी टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खबरदारी म्हणून पोल्ट्री फार्म परिसरात डस्टिंग करण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तलावात असलेल्या मृत कोंबड्या बाहेर काढून संपूर्ण तलाव परिसर स्वच्छ करावा, अशी सूचनाही दिली. तलावावर पाणी पिण्यासाठी गावातील पशुपालकांनी गुरेढोरे सद्यस्थितीत पाठवू नये, अशी दवंडी ग्रामपंचायत प्रशासनाने गावात द्यावी, अशी सूचनाही केली.ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे उपअभियंता जि. के. राव यांनी याप्रकरणी हिंगणा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्याची माहिती मिळाली आहे. वलनी तलाव व दाभा येथील पोल्ट्री फार्म कोंढाळी पोलिसांच्या अखत्यारित येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे या प्रकरणाची पुढील कारवाई कोंढाळी पोलिसच करू शकतात असे सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासनाने बजावली नोटीस
दाभा आगरगाव येथील पोल्टी फार्ममधील मृत कोंबड्या वलनी तलावात टाकण्यात आल्या. तसेच गावाशेजारीही फेकण्यात आल्या. जनतेचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पोल्ट्री फार्म संचालकाला 24 सप्टेंबर रोजी नोटीस बजावली. कारणे दाखवा नोटीस असून या प्रकरणावर स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. स्पष्टीकरण समाधानकारक न मिळाल्यास यासंबंधी कठोर कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने नोटीसमध्ये दिला आहे. सदर नोटीस कुलूपबंद पोल्टी फॉर्मला लावण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Complaint Against Poultry Farm Operator