बंदोबस्तासाठी आलेले पाहुणे पोलिस परतले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यातून पाच हजार पोलिस उपराजधानीत दाखल झाले होते. गेल्या 18 दिवसांपासून शहरात पाहुणे आलेल्या पोलिसांची पोलिस आयुक्‍तांनी सर्वोत्तम व्यवस्था केली होती. मात्र, आज रविवारी बंदोबस्त संपल्याचे जाहीर केल्यानंतर पोलिसांनी एकमेकांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाला लागले.

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यातून पाच हजार पोलिस उपराजधानीत दाखल झाले होते. गेल्या 18 दिवसांपासून शहरात पाहुणे आलेल्या पोलिसांची पोलिस आयुक्‍तांनी सर्वोत्तम व्यवस्था केली होती. मात्र, आज रविवारी बंदोबस्त संपल्याचे जाहीर केल्यानंतर पोलिसांनी एकमेकांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाला लागले.

शहरात बंदोबस्तासाठी दाखल झालेल्या सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांना कडाक्‍याच्या थंडीतही पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी 18 ठिकाणी योग्य व्यवस्था केली होती. उबदार ब्लॅंकेट्‌स, उशी, निवास आणि भोजनाची चांगली व्यवस्था केल्यामुळे सर्वच पोलिस कर्मचारी सरबराईने भारावले होते. अनेकांनी नागपुरातील अनुभव एकमेकांशी शेअर केले. मोबाईल क्रमांकांची देवाण-घेवाण करून पुढच्या हिवाळी अधिवेशनासाठी भेटूया! असे आश्‍वासन देऊन नागपुरातून एकमेकांना "अलविदा' केले.

महिला पोलिसांची "सेल्फी'
हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तात आलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी एकमेकींची भेट घेऊन सेल्फी काढली. अनेक महिला अधिकाऱ्यांसोबत "मॅम वन सेल्फी प्लीज' असे म्हणत फोटो काढले. महिला पोलिसांनी व्हॉट्‌सऍपच्या ग्रुप तयार केले होते. त्यामध्ये अनेकींनी आपापले अनुभव लिहिले.

ही दोस्ती तुटायची नाय..!
राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून आलेल्या महिला पोलिसांची व्यवस्था चार ठिकाणी करण्यात आली होती. बंदोबस्तादरम्यान अनेक महिला पोलिसांची मैत्री झाली. गेल्या 18 दिवसांपासून सोबतच जेवण, निवास, ड्यूटी आणि गप्पा सुरू होत्या. मात्र, आज एकमेकींचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा अनेकींच्या डोळ्यांत विरहाचे अश्रू तरळत होते. मात्र, "पुन्हा नक्‍की भेटू' असे भावूक आश्‍वासन एकमेकींना महिला पोलिस देत होत्या.

बॅरिकेड्‌स काढण्यासाठी धावपळ
अधिवेशनामुळे विधानभवनाकडे येणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले होते. तसेच मोर्चा स्टॉपिंग पॉइंटच्या 15 रस्त्यांवरही मोठमोठे बॅरिकेड्‌स लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर लाकडी बल्ली बांधून वाहतूक अडविण्यात आली होती. मात्र, आज पोलिसांनी सर्वच बॅरिकेड्‌स काढले आणि वाहतुकीसाठी रस्ता खुला केला. अनेक वाहनचालकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.

Web Title: Police deployed for the guests returned