पोलिसांच्या हनिट्रॅपमध्ये अडकला आरोपी, बनावट  फेसबुकवरून महिलेस पाठवायचा मॅसेज 

संतोष ताकपिरे
Friday, 2 October 2020

करण रमेश रविदास (वय 20, रा. रविदासनगर, धामणगावरेल्वे), असे अटक युवकाचे नाव आहे. त्याने फेब्रुवारी 2020 मध्ये महिलेच्या नावाने तीन फेसबुक अकाउंट उघडले. त्यासाठी तिच्या प्रोफाइल फोटोचा गैरवापर करून तिला अश्‍लील मॅसेज, फोटो शेअर केले.

अमरावती : शहरातील एका महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट एक नव्हे तर चार खाती उघडणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनाही हनिट्रॅपसारख्या अस्त्राचा वापर करावा लागला. सायबर पोलिसांनी रचलेल्या ट्रॅपमध्ये महिलेला मनस्ताप देणारा अखेर अडकला.

करण रमेश रविदास (वय 20, रा. रविदासनगर, धामणगावरेल्वे), असे अटक युवकाचे नाव आहे. त्याने फेब्रुवारी 2020 मध्ये महिलेच्या नावाने तीन फेसबुक अकाउंट उघडले. त्यासाठी तिच्या प्रोफाइल फोटोचा गैरवापर करून तिला अश्‍लील मॅसेज, फोटो शेअर केले. महिलेस मानसिक त्रास होत असल्यामुळे तिने चार ऑगस्ट रोजी याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. 

त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला. बनावट फेसबुक अकाउंट तयार करून तिची बदनामी झाली. परंतु करणकडून पुन्हा असाच गैरप्रकार सुरू झाला. महिलेच्या तक्रारीवरून चार ऑगस्ट रोजी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. परंतु सोशल मीडियावर बनावट खाते उघडून बदनामी करणाऱ्यांबद्दल माहिती मिळविणे कठीण जात होते. 

अधिक वाचा - आता शंभर सेकंदात कापता येणार अपघातग्रस्त रेल्वे डबा
 

सायबर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास काही प्रमाणात हनिट्रॅपसारखे अस्त्र वापरून त्याच्याबद्दल आवश्‍यक ती माहिती मिळवली. महिलेस छेडणारा करण हाच असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला अटक केली. करणने घटनेची कबुली दिली, असे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले.

 सुरक्षेसाठी सेटिंगमध्ये बदल करा

सायबर गुन्हेगार सोशल मीडियावरील फोटोचा गैरवापर करतात. तशा तक्रारीही वाढल्या. त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ अपलोड करताना काळजी घ्यावी. सोशल मीडियावर अॅप्लिकेशन वापरताना व खासगी माहिती कुणी पाहावी, याबाबत योग्य सेटिंग करावे. अकाउंट हॅक होऊ नये, यासाठी स्ट्रॉंग पासवर्ड ठेवावेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले.

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police have arrested a person who sent a message to a woman on Facebook