पोलिस पाटील भरतीवर नक्षली सावट

मनोहर बोरकर
मंगळवार, 1 जानेवारी 2019

एटापल्ली (जि. गडचिरोली) : अहेरी उपविभागातील 252 गावांतील पोलिस पाटलांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, अनेक गावांमध्ये पोलिस पाटील नेमणुकीला माओवाद्यांकडून विरोध होत आहे. त्यामुळे आजपर्यंत केवळ 12 गावांमध्येच उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. पोलिस खबऱ्या म्हणून माओवाद्यांकडून हत्या केली जात असल्याने पोलिस पाटील पदासाठी युवकांची नकारात्मक भूमिका असल्याचे दिसून येते.

नक्षलप्रभावित एटापल्ली हा एटापल्ली व भामरागड असे दोन तालुक्‍यांचा उपविभाग आहे. एटापल्ली तालुक्‍यात 151 व भामरागड तालुक्‍यात 101 पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कैलास अंडील यांच्या नेतृत्वात भरती प्रक्रिया राबविली जात आहे. 30 डिसेंबरला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत एटापल्ली तालुक्‍यातील 40 गावांच्या व भामरागड तालुक्‍यातील केवळ 2 गावांच्या उमेदवारांनी अर्ज सादर केले. त्यामुळे रिक्त जागा भरण्यासाठी प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
अनेक वर्षांपासून माओवाद्यांकडून पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून पोलिस पाटलांची हत्या केली जात आहे. त्यामुळे अतिदुर्गम व नक्षलप्रभावित गावांतील युवकांनी पोलिस पाटील पद भरतीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला भामरागड व एटापल्ली या दोन्ही तालुक्‍यांतील 60 गावांतील 85 उमेदवारांकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्यात आले. यातील 42 गावांकरिता 63 अर्ज पात्र होऊन 30 डिसेंबरला लेखी परीक्षा घेण्यात आली. या वेळी 38 गावांतील 49 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. चार गावांतील 7 उमेदवार गैरहजर होते.
आज, मंगळवारी 13 गावांतील मुलाखतीस पात्र 17 उमेदवारांमधून 12 गावांतील 13 उमेदवारांनी मुलाखत दिली. या वेळी आणखी चार उमेदवार गैरहजर राहिले. त्यामुळे गावांच्या सामाजिक, सांस्कृतिक व कायदेशीर शासन व प्रशासनाचा दुवा मानलेले पोलिस पाटील पद नक्षली दहशतीत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने 252 पोलिस पाटलांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली असली, तरी नक्षली दहशतीमुळे केवळ 12 गावांतच पोलिस पाटील नियुक्त होणार आहेत. तर, 240 गावांतील नागरिकांना गाव कारभारी पोलिस पाटलांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Police patil recruitment naxalite