पोलिसांनी टाकला छापा अन्  जे दिसले ते अविश्वसनीयच होते... अवश्य वाचा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

एकूण एक हजार बियाण्यांची पाकिटे ज्यांची किंमत 9 लाख रुपये आहे व तीन लाख रुपये किमतीचे पीकअप व्हॅन असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल अनधिकृतपणे वाहतूक करताना आढळून आला.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : सरकी, पॅकिंग मशीन व साध्या सरकीला लावायचे सेलो नावाचे रासायनिक द्रव्य हे साहित्य दत्तापूर पोलिसांनी शनिवारी (ता.13) कासारखेड येथील शेतातून जप्त केले. त्यामुळे तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. 

शहरातील रामेश्‍वर चांडक या कृषी केंद्र संचालकाच्या हिंगणगाव येथील एका घरात बोगस बियाण्यांचा अवैध साठा असल्याची माहिती कृषी विभागाला प्राप्त झाली होती. दरम्यान, तालुक्‍यात बोगस बियाणे विक्रीसंदर्भात कारवाईचा सपाटा सुरू असल्याने संबंधित कृषी केंद्र संचालकाने आपला अवैध बियाण्यांचा साठा योग्य ठिकाणी लपवून ठेवण्यासाठी प्रयत्न चालवले होते. गुरुवारी (ता. 11) मध्यरात्री 12 च्या सुमारास हिंगणगाव येथील त्याच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका घरातील अवैध मुद्देमालाची योग्य विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत माहिती मिळताच दत्तापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळावर पोहोचले. इतक्‍यात बियाण्यांनी भरलेले पीकअप वाहन (एमएच 32 क्‍यू 0275) घटनास्थळावरून पळून गेले होते. दत्तापूर पोलिसांनी शोध घेतला असता हिंगणगावपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कासारखेड येथे वाहनचालक स्वतःच्या घराजवळ वाहन उभे करून होता. यावेळी दत्तापूर पोलिसांनी वाहनाला तपासले असता त्यामध्ये बीटी हायब्रीड कॉटन सीडचे 40 पोते मिळून आले होते. पैकी एका पोत्याला फोडून तपासले असता यामध्ये बोगस बियाण्यांचे 25 सीलबंद पाकिटे दिसून आली. 

वाहनधारकासह तिघांना अटक

एकूण एक हजार बियाण्यांची पाकिटे ज्यांची किंमत 9 लाख रुपये आहे व तीन लाख रुपये किमतीचे पीकअप व्हॅन असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल अनधिकृतपणे वाहतूक करताना आढळून आला. दत्तापूर पोलिसांनी वाहनधारकसह तिघांना अटक केली होती. त्यांना धामणगावच्या न्यायालयाने 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, दत्तापूर पोलिसांनी संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास व चौकशीदरम्यान रामेश्‍वर चांडक याच्या कासारखेडा येथील शेतातील टीन शेडमधून सात कट्टे खुली सरकी, पॅकिंग मशीन, सेलो कंपनीचे रासायनिक द्रव्य जप्त केले. यावेळी दत्तापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकटे, पोलिस कर्मचारी मंगेश लकडे, उमेश वाघमारे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

अवश्य वाचा- धंद्यावर बसवण्याची धमकी देणारी `लुटेरी दुल्हन` प्रिती दास पोलिसांच्या जाळ्यात

कासारखेड येथील शेतात झाडाझडती केली असता रामेश्‍वर चांडक यांच्या शेतात वेगवेगळ्या वाणांची, बोगस बीटी बियाण्यांची खाली पाकिटे, पॅकेजिंग मशीन, सरकीवर प्रक्रिया करण्याचे औषध तसेच गावरान सरकीचा साठा आढळून आला आहे. अजून तपासात काय काय उलगडा होतो याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात आणखी काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raid and found duplicate seed making materials