पोलिस ठाणे नव्‍हे डम्पिंग यार्ड

अनिल कांबळे
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

बेवारस वाहनांची परस्पर विल्हेवाट लावण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून अशा वाहनांचा लिलाव केला जातो. त्यातून मिळणारी रक्कम शासनाकडे जमा केली जाते. चोरीची किंवा किरकोळ अपघातातील वाहने मूळ मालकांना दिली जातात. रस्त्यांवर बेवारस वाहने पोलिस ताब्यात घेतात. या वाहनांचे मूळ मालक पोलिसांपर्यंत पोहोचत नाही. अशा वाहनांचा लिलाव केला जातो.  
- नीलेश भरणे, पोलिस उपायुक्‍त, नागपूर शहर

नागपूर - बेवारस सापडलेली किंवा गुन्ह्यात जप्त केलेली हजारो वाहने शहरातील जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये धूळखात पडली आहेत. प्रशासनाकडून वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया लालफीतशाहीत अडकल्याने जप्त वाहनांपैकी ७५ टक्‍के वाहने जागेवरच कुजली आहेत. 

शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये अनेक वाहने बेवारस पडून असतात. ती वाहने पोलिस जप्त करून ठाण्यात आणतात. गुन्ह्यातील किंवा अपघातातील वाहनेसुद्धा पोलिस ठाण्यात जमा केली जातात. वर्षानुवर्षे जप्त केलेली वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात पडून असतात. यात दुचाकी, ऑटो, ट्रक, कार या वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. पाऊस आणि उन्हामुळे ही वाहने गंजण्याच्या प्रक्रियेत असतात. 

बरेचदा चोरलेल्या वाहनांचे काही भाग काढून अशी वाहने रस्त्याच्या कडेला लावून चोरटे पसार होतात. काही घटनांमध्ये चोरटे अशा वाहनांचा वापर गुन्हा करण्यासाठी करतात. ज्यांची वाहने चोरी जातात अशांपैकी अनेक वाहनचालक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. वाहनांचा मूळ मालक सापडत नसल्यास पोलिस अशा वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करतात. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.

प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करतात. पोलिस ठाण्यात जप्त वाहनांचे काही मूळ मालक दंड भरून वाहने ताब्यात घेतात. मात्र, अनेक वाहने ताब्यात घेण्यासाठी वाहनचालक येत नाहीत. त्यामुळे वाहने जागीच सडतात.

पोलिसांसाठी डोकेदुखी
पोलिस ठाण्यात जप्त झालेली वाहने किंवा मुद्देमाल सांभाळण्याची जबाबदारी मोहरीरची असते. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जप्त वाहनातील एखादे वाहन चोरी होणे किंवा गहाळ झाल्यास संबंधित पोलिस कर्मचारी जबाबदार असतो. त्यामुळे ठाण्यात जप्त वाहने सांभाळणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

बेवारस वाहनांची परस्पर विल्हेवाट लावण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून अशा वाहनांचा लिलाव केला जातो. त्यातून मिळणारी रक्कम शासनाकडे जमा केली जाते. चोरीची किंवा किरकोळ अपघातातील वाहने मूळ मालकांना दिली जातात. रस्त्यांवर बेवारस वाहने पोलिस ताब्यात घेतात. या वाहनांचे मूळ मालक पोलिसांपर्यंत पोहोचत नाही. अशा वाहनांचा लिलाव केला जातो.  
- नीलेश भरणे, पोलिस उपायुक्‍त, नागपूर शहर

Web Title: Police station not dumping yards