esakal | बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांची पायदळवारी पोलिसांनी अर्ध्यातच रोखली 
sakal

बोलून बातमी शोधा

Andolan

बरांजस्थित कर्नाटका एम्टा कोळसा खाण ही ३१ मार्च २०१५ पासून बंद झाली. आता ही खाण पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, कोळसा खाण घोटाळ्यानंतर या खाणीचा मालक कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आहे.

बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांची पायदळवारी पोलिसांनी अर्ध्यातच रोखली 

sakal_logo
By
रविकांत वरारकर

भद्रावती (जि. चंद्रपूर) ः बरांज कोळसा खाणीत काम सुरू करण्याआधी प्रकल्पबाधित गावकरी, कामगारांच्या मागण्यांचे निराकरण करण्याबाबतचे निवेदन खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. मात्र, कंपनीकडून समस्या सोडविण्याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता गुरुवारी (ता. २९) भद्रावती ते चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या पायदळवारीला पोलिस प्रशासनाने ताडाळीजवळ रोखले. 

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. मात्र, आंदोलकांनी आम्हाला जेलमध्ये टाका, आम्ही अन्नत्याग करू, अशी भूमिका घेताच त्यांना पोलिस वाहनात बसवून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचविण्यात आले. तिथे आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर आंदोलकांना भद्रावतीपर्यंत सोडण्यात आले. आंदोलन शांततेत सुरू असताना मध्ये थांबवून व अटक करून प्रशासनाने आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रकल्पग्रस्त, कामगारांनी केला. 

बरांजस्थित कर्नाटका एम्टा कोळसा खाण ही ३१ मार्च २०१५ पासून बंद झाली. आता ही खाण पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, कोळसा खाण घोटाळ्यानंतर या खाणीचा मालक कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आहे. परंतु, कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडून अजूनपर्यंत प्रकल्पबाधित गावकरी, खाण कामगारांच्या समस्या सोडविल्या नाही. बरांज खुली कोळसा खाणीतील आधीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांना कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, खाण बंद झाली तेव्हापासून म्हणजे १ एप्रिल २०१५ पासून कामगारांचे थकीत वेतन द्यावे, खाण सुरू होण्याअगोदर सीएमपीएफ खात्यात कामगारांचे भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात यावे, बरांज (मोकासा) व चेकबरांज (मानोरा) या दोन्ही प्रकल्पबाधित गावांचे खाण सुरू करण्याअगोदर पुनर्वसन करण्यात यावे, महाराष्ट्र शासन व कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड यांच्यात १५ जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या पुनर्वसन पॉलिसीमध्ये खाण सुरू होण्यापूर्वी सुधारणा करण्यात यावी, प्रकल्पबाधित गावातील भूसंपादन केलेल्या शेतकरी किंवा त्यांच्या मुलांना कंपनीच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, बरांज (मोकासा) व चेकबरांज (मानोरा) या दोन्ही प्रकल्पबाधित गावांतील उर्वरित शेतजमीन भूसंपादित करावी, या मागण्यांचे निवेदन खासदार, जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, या मागण्या सोडविण्याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नाही. त्यामुळे कामगार व प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता पायदळ वारी काढण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

गुरुवारी (ता. २९) निवेदनाची प्रत घेऊन कामगार, प्रकल्पग्रस्त भद्रावतीहून चंद्रपूरला येण्यासाठी पायदळ निघाले. भद्रावतीहून घोडपेठसमोर प्रकल्पग्रस्त, कामगार पोहोचले. याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली. पोलिसांचे पथक रवाना झाले. ताडाळीजवळ असलेल्या पुलाजवळ प्रकल्पग्रस्त, कामगारांची पायदळवारी रोखण्यात आली. त्यांना ताब्यात घेण्यात येऊन सुटका करण्यात आली. याप्रसंगी कामगार नेते राजू डोंगे, रामदास मत्ते, दिनेश वानखेडे, राजगोपाल जयरामन, संजय ढाकणे, प्रभाकर कुळमेथे यांच्यासह कामगार आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. 


महत्वाची बातमी - शेतकऱ्यांनो, हिरव्या संत्र्याला गळती आली? घाबरू नका! कृषी विभागाने पुढील उपाय करण्याचा दिला सल्ला
 

सभापती ठेंगणे खासगी वाहनात 

पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे हे सुरवातीला या पायदळ वारीत सहभागी झाले होते. मात्र, घोडपेठ येथून ते पायदळवारीतून निघून गेले. नंतर खासगी वाहनाने येऊन पुन्हा आंदोलनात सहभागी झाले. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

loading image