esakal | अखेर गडचिरोलीत सुस्त प्रशासनाला आली जाग; लॉकडाउनदरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

police taken action against people roaming in gadchiroli during lockdown

देशभरासह जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी तब्बल सहा जणांना कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे सरकारने संसर्ग पसरू नये, यासाठी कडक निर्बंध घातले आहेत. शिवाय शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाउन करण्यात येत आहे.

अखेर गडचिरोलीत सुस्त प्रशासनाला आली जाग; लॉकडाउनदरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : सरकारने शनिवार, रविवारी वीकेंड लॉकडाउन जाहीर केल्यानंतरही शनिवारी पहिल्या दिवशी अनेक वाहने रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत होती. दैनिक सकाळने याकडे लक्ष वेधत रविवार (ता. 11) बातमी प्रकाशित करता सुस्त झालेले प्रशासन एकदम दक्ष झाले. त्यामुळे रविवारी शहरात ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी वाहनांची चौकशी करताना आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना दिसून आले. आता येणाऱ्या शनिवार आणि रविवारीसुद्धा हीच स्थिती राहील अशी अपेक्षा आहे. 

देशभरासह जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी तब्बल सहा जणांना कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे सरकारने संसर्ग पसरू नये, यासाठी कडक निर्बंध घातले आहेत. शिवाय शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाउन करण्यात येत आहे. मात्र, शनिवारी पहिल्या दिवशी दुकाने बंद असली, तरी रस्त्यांवरची वर्दळ कायम होती. बाजारातील सारीच दुकाने बंद असताना अनेक दुचाकीस्वार विनाकारण बाजारात भटकत होते. जणू लॉकडाउनच नाही, अशा तोऱ्यात काही नागरिक वावरत होते. 

यंदाही पालखी आणि दिंडीविना होणार नववर्षाची सुरुवात; कोरोनामुळे गुढीपाडव्याचा उत्साह...

पण, लॉकडाउनचा पहिला दिवस असूनही शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकासह इतर कुठल्याच ठिकाणी पोलिस बंदोबस्त दिसून आला नाही. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांचे चांगलेच फावले. घरात बसून कंटाळलेले अनेक हौशी नागरिक आपली वाहने घेऊन विनाकारण रस्त्यांवर भटकत होते. त्यांना अडणारे कुणी नसल्याने अशा वाहनांची संख्या वाढली होती. यासंदर्भात दैनिक सकाळने बातमी प्रकाशित करताच दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासूनच अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त दिसून आला. वाहतूक पोलिसांसह इतर पोलिस कर्मचारीही रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांची चौकशी करत होते. 

अतिमहत्त्वाचे काम नसताना उगाच बाहेर पडलेल्या वाहनचालकांवर व वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत होती. खरेतर सध्या कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने पोलिस बंदोबस्त लावण्याची वेळ येण्याऐवजी नागरिकांनीच नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. पण, नियम मोडण्यातच धन्यता मानणाऱ्या काही नागरिकांना घरात बसवत नाही. त्यामुळे अशा नागरिकांसाठी कारवाईचा बडगा उगारणे आवश्‍यक आहे. रविवारी असा बडगा उगारला गेल्याने रस्त्यावरची वर्दळ कमी झाली. जिल्ह्याच्या इतर भागांतही कोरोनामुळे घोषित केलेल्या लॉकडाउनचे शिस्तीत पालन झाले. पुढील वीकेंड लॉकडाउनच्या वेळेसही नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मागणी होत आहे.

'आम्ही यवतमाळकर' विशेष मोहीम: कोरोना...

मृत्यूसंख्या वाढली

कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असताना आता मृत्यूसंख्याही वाढल्याचे दिसून येत आहे. रविवारी जिल्ह्यात सहा मृत्यूंसह 296 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच या दिवशी 102 कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 12396 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10687 वर पोहोचली. तसेच सध्या 1576 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 133 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रविवारी सहा नवीन मृत्यूंमध्ये आरमोरी तालुक्‍यातील 60 वर्षीय पुरुष, तर इतर जिल्ह्यांतील बाधितामध्ये ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथील तीन पुरुषांचा समावेश असून एकाचे वय 62 वर्षे, दुसऱ्या व्यक्तीचे वय 37 वर्षे व तिसऱ्या व्यक्तीचे वय 54 वर्ष होते. चंद्रपूर जिल्ह्यातीलच चिमूर येथील 54 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच गडचिरोली तालुक्‍यातील मानसिक आजाराने ग्रस्त 6 वर्षीय बालकाचा समावेश आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image