शेतकऱ्यांचे राजकीय संघटन लोकसभेत भूईसपाट! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

  • यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, पटोले, त्रिवेदी यांनी पेटविले होते अकोल्यात शेतकरी आंदोलन
  • ​शेतकरी संघटनाने नेतृत्व करीत भाजप सरकारविरोधात दंड थोपटले होते
  • देशभरात भाजपाने मोठी मुसंडी मारत शेतकऱ्यांचे राजकीय संघटन केले भूईसपाट

अकोला : भाजप सरकारद्वारे शेतकऱ्यांचे शोषण केले जात असून, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, रविकांत तुपकर, पृथ्वीराज चव्हाण, दिनेश त्रिवेदी आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी आंदोलन पेटविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कोणताच लाभ झाला नसून, अकोल्यासह देशभरात भाजपाने मोठी मुसंडी मारत शेतकऱ्यांचे हे राजकीय संघटन भूईसपाट केले आहे. 

शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाहीत, किमान आधारभूत किमतीने सरकार शेतकऱ्यांचा माल खरेदी करत नाही, चुकारे अदा करत नाही, सर्व योजना शेतकरी विरोधी धोरणातून राबविल्या जातात. संपूर्ण सरसकट कर्जमाफी, वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या इत्यादी विषयांना हात घालत अकोल्यात शेतकरी संघटनांकडून भाजप सरकारचा निषेध व्यक्त होत होता. याबाबत राज्यातच नव्हे तर, देशभरात चर्चा झाली. अनेकदा राज्य सरकारला या संघटनांच्या मागण्यांची दखलही घ्यावी लागली. त्यामुळे अकोल्यातीलच नव्हे तर, राज्यातील व देशभरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार करीत, देशातील दिग्गज नेत्यांनी अकोल्यात उपस्थिती दर्शवून, शेतकरी संघटनाने नेतृत्व करीत भाजप सरकारविरोधात दंड थोपटले होते. त्यांनी पेटविलेल्या शेतकरी आंदोलनाची राज्यातीलच नव्हे तर, राष्ट्रीय स्तरावरही चर्चा झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने त्यांचे नेतृत्व नाकारले आणि अकोल्यात संजय धोत्रे यांनी 5 लाख 54 हजार 444 मते घेऊन दणदणीत विजय मिळविला तर, देशात एनडीएने ऐतिहासिक विजयासह 347 जागा पटकाविल्या. त्यामुळे या दिग्गजांच्या नेतृत्वात निर्माण झालेले शेतकरी संघटन अकोल्यातच नव्हे तर, देशभरात अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. 

या दिग्गजांनी केले होते नेतृत्व -
देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू, आमदार आशिष देशमुख, दिनेश त्रिवेदी, संजय सिंग, रविकांत तुपकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी संघटनांचे नेतृत्व करून भाजप सरकारचा निषेध केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political organization of the farmers in Akola is stopped now