फाटक्या झोळीतूनही दिला घासातला घास... (व्हिडिओ)

राम चौधरी राम चौधरी 
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

अल्लानेच मला बुद्धी दिली
सबका पालनकर्ता असलेला अल्लाच प्रत्येकाला घास देतो. माझ्याजवळ थोडं धान्य होतं आणि माझं पोट भरलेलं होतं. त्यामुळं मला अल्लानेच बुद्धी दिली, भुकेलेल्यास अन्न देण्याची. हे धान्य मला बीपीएल कार्डावर स्वस्त धान्य दुकानातून मिळालं होतं.
- हिऱ्याबाई नौरंगबादी, गावकरी, सूरकुंडी​

वाशिम : अंगावर जीर्ण कपडे, डोक्यावर चंद्रमौळी छप्पर, घरात रात्रीचे जेवण कसेबसे भागेल एवढेच धान्य... पण आपल्या घासातला घास दुसऱ्याला देण्याची दानत मात्र, गर्भश्रीमंतालाही लाजविणारी! वाशीमजवळच्या सूरकुंडी गावातील मुस्लिम गवळी मोहल्ल्यातील हिऱ्याबाईचे नौरंगबादी या वृद्धेचे हे आभाळाएवढे मन अनुभवले, पूरग्रस्तांना मदत गोळा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी.

काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीत महापुरानं थैमान घातले. हजारो लोक संकटात सापडले. या संकटातून त्यांना सावरायला अख्खा महाराष्ट्र उभा राहिला. त्यात आघाडीवर होता विदर्भ. वाशिममध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संभाजी ब्रिगेड संघटनेने गावागावांत मदतीसाठी फेरी काढली. लोकांनी स्वेच्छेने त्यांच्याकडे कुवतीप्रमाणे मदत सोपविली.

पण, एका झोपडीतून आलेल्या मदतीने मात्र, हे कार्यकर्तेही भावूक झाले. जिला रोजच्या खायचीही भ्रांत आहे, अशा पंचाहत्तरीच्या हिऱ्याबाई सुरकुंडी गावाच्या मुस्लिम गवळी मोहल्ल्यात आपल्या तुटक्या झोपडीत राहतात. कार्यकर्ते जेव्हा मदतीचे आवाहन करत आले, तशा हिऱ्याबाई आपल्या झोपडीतून बाहेर आल्या. त्यांच्या हातात होते, अल्युमिनियमचे छोटे पातेले आणि त्यात होते, त्यांच्या संध्याकाळच्या जेवणाची सोय करणारे थोडेसे तांदूळ. त्यांनी उदार मनाने ते पातेले कार्यकर्त्यांकडे सोपविले. कार्यकर्त्यांनी ते आपल्याकडे रिते करून घेतले, तेव्हा हिऱ्याबाईंच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे होते.

अठरा विश्व दारिद्र्य म्हणावे, अशा गरिबीच्या परिस्थितीत हिऱ्याबाईंचा मुलगा नौरंगाबादी गावातील गुरे राखून आई आणि पत्नी हसिनाचे पोट भरतो. स्वस्त धान्य दुकानातून दारिद्र्य रेषेवर मिळणारे धान्य या कुटूंबाचा जगण्याचा आधार आहे. मात्र, तेच धान्य अर्थात घासातला घास दान करणाऱ्या हिऱ्याबाईच्या मोठेपणापुढे मोठ्या दात्यानेही मान तुकवावी, अशी कृती हिऱ्याबाईने केली.

अल्लानेच मला बुद्धी दिली
सबका पालनकर्ता असलेला अल्लाच प्रत्येकाला घास देतो. माझ्याजवळ थोडं धान्य होतं आणि माझं पोट भरलेलं होतं. त्यामुळं मला अल्लानेच बुद्धी दिली, भुकेलेल्यास अन्न देण्याची. हे धान्य मला बीपीएल कार्डावर स्वस्त धान्य दुकानातून मिळालं होतं.
- हिऱ्याबाई नौरंगबादी, गावकरी, सूरकुंडी​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor women gave her grain to floodsuffer people