पोषण आहारात आढळल्या अळ्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

नागपूर : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता मध्यान्ह भोजनात दिल्या जाणाऱ्या खिचडीत चक्क अळ्या आढळल्याची घटना प्रतापनगर प्राथमिक शाळेत घडली. शिक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

नागपूर : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता मध्यान्ह भोजनात दिल्या जाणाऱ्या खिचडीत चक्क अळ्या आढळल्याची घटना प्रतापनगर प्राथमिक शाळेत घडली. शिक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
नव्या करारानुसार यंदा प्रथमच शहरातील शाळांना शिजविलेला पोषण आहार देण्यासाठी दहा महिला बचतगटांना कंत्राट देण्यात आले आहे. त्यापैकीच एक असलेल्या सौरभ महिला विकास मंचला मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रातील शाळांची जबाबदारी देण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास शिजविलेला पोषण आहार बचतगटातील कर्मचाऱ्यांनी शाळेत पोहोचविला. मधल्या सुटीत शिक्षक पवन नेटे हे विद्यार्थ्यांना आहार वाटप करत असताना भात कच्चा आढळला. त्यांनी भाताची अधिक पाहणी केली. त्यात मोठ्या प्रमाणात अळ्या असल्याचे त्यांना आढळून आले. काही अनर्थ घडण्याच्या आधी त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला भात व डाळभाजी परत मागविली. मुलांना खिचडीचे वाटप थांबविण्यात आले. विभागप्रमुख दिलीप काळबांडे यांनी तातडीने बचतगटाच्या व्यवस्थापकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी काळबांडे व मुख्याध्यापक श्रावण सुरकार यांनी शालेय पोषण आहाराचे अधीक्षक गौतम गेडाम यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने शाळेत दाखल होऊन पोषण आहाराची पाहणी केली. त्यात कच्चा भात आणि मोठ्या प्रमाणात अळ्या आढळून आल्यात. त्यांनी तातडीने मंचच्या कंत्राटदाराशी संपर्क साधला. यावर कंत्राटदाराकडून थातूरमातूर उत्तर देण्यात आले. यानंतर शाळेच्या पोषण वाटपाचे काम थांबविण्याचा निर्णय अधीक्षकांनी घेतला. याप्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती गौतम गेडाम यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: poshan aahar news