‘गालबोट न लागो तुझ्या न्यायाला...’

अतुल मांगे 
रविवार, 13 मे 2018

नागपूर - ‘गालबोट न लागो तुझ्या न्यायाला, 
हद्दपार कर गं तू अन्यायाला, 
लेवून कायदा शब्दांचा न्याय साजरा, 
नामदेवाचा हा तुला मानाचा मुजरा’ 

असे आवाहन न्यायदेवतेला करून प्रत्येकाला किमान कायद्याचे ज्ञान असण्यासाठी एक व्यक्‍ती धडपडत आहे. आर्थिक सुबत्ता नसताना कायद्यावरील एक-दोन नव्हे, तर २५ लाखांची तब्बल ३५ वर पुस्तके, कवितासंग्रहांचे प्रकाशन करून जनमानसांमध्ये कायदा रुजविण्याचे कार्य ते करीत आहेत. त्या व्यक्‍तीचे नाव आहे ॲड. नामदेवराव गव्हाळे.

१ जुलै १९५५ रोजी हिंगणा तालुक्‍यातील कान्होलीबारा या गावात अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या गव्हाळे यांना कायदा, राजकारण, समाजकारणाची आवड बालपणापासूनच होती. वर्ध्यातील जी. एस. महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम. केले. १९८१ साली त्यांनी नागपुरातून विधी शाखेची पदवी घेतली. १९८२ पासून त्यांनी वकिली सुरू केली. वकिली करताना कायद्याबाबत सर्वसामान्य नागरिकांचे अज्ञान पाहून ते अस्वस्थ व्हायचे. जागोजागी होणारी सर्वसामान्यांची फसवणूक पाहून वकिली व्यवसायासोबत नागरिकांना कायद्याचे ज्ञान देऊन सुज्ञ करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी कायद्याची माहिती देणारी पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. ओळख प्राथमिक कायद्याची, सामाजिक न्याय, भारतीय संविधान अधिकार, फिरते लोक अदालत, स्त्री व कायदा अशी कायद्यावरील एकाहून एक सरस पुस्तके याशिवाय कवितासंग्रह लिहून नव्या पिढीला समृद्ध करण्याचा विडाच त्यांनी उचलला.  

प्रत्येक व्यक्‍तीला कायद्याचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. कायद्याचे ज्ञान असल्यास कोणताही व्यक्‍ती सहसा गुन्हा करण्यास धजावणार नाही. तसेच एखाद्याची फसवणूक होत असल्यास याच पुस्तकांच्या माध्यमातून तो सजग होऊ शकतो. माझ्या पुस्तकांच्या माध्यमातून कायद्याबाबत सजगता निर्माण होत असल्याचे समाधान वाटते.
-ॲड. नामदेवराव गव्हाळे

Web Title: positive story namdevrao gahvale story