थकबाकीदारांची मालमत्ता घेणार ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : थकीत मालमत्ता करासाठी महापालिकेने अनेकांच्या मालमत्तांचा लिलाव केला. परंतु, काही मालमत्ता खरेदीसाठी कुणीही पुढे न आल्याने त्या महापालिकेने स्वतःच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. लकडगंज झोनमधील सहा मालमत्ता महापालिका नावावर करणार असून, यासंबंधीचा प्रस्ताव कर आकारणी विभागाने तयार केला आहे.

नागपूर : थकीत मालमत्ता करासाठी महापालिकेने अनेकांच्या मालमत्तांचा लिलाव केला. परंतु, काही मालमत्ता खरेदीसाठी कुणीही पुढे न आल्याने त्या महापालिकेने स्वतःच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. लकडगंज झोनमधील सहा मालमत्ता महापालिका नावावर करणार असून, यासंबंधीचा प्रस्ताव कर आकारणी विभागाने तयार केला आहे.
महापालिकेचे पाचशेवर कोटी थकीत आहेत. थकबाकीच्या वसुलीसाठी महापालिकेने कठोर पाऊले उचलत थकबाकीदारांची मालमत्ता लिलावही केली. परंतु, जप्त केलेल्या काही मालमत्ता खरेदीसाठी कुणीही पुढे आले नाही. परिणामी या मालमत्ता नाममात्र बोलीवर आता स्वतःच्या नावे करणार आहे. यात लकडगंज झोनमधील वसुलीसाठी कर विभागाने काही थकबाकीदारांची मालमत्ता नावे करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यात लकडगंज येथील रहिवासी नितीन भोजवानी यांच्या दोन मालमत्ता आहेत. त्यांनी दोन्ही मालमत्तांचा कर 1970 पासून भरला नाही. एका मालमत्तेवर दंड तसेच वॉरंट खर्च व जाहिरात खर्चासह एक लाख 17 हजार 432 रुपये थकीत आहे. दुसऱ्या मालमत्तेवरही एक लाख 43 हजार 604 रुपये थकीत आहे. त्यामुळे त्यांची मालमत्ता महापालिका आता स्वतःच्या नावावर करणार आहे.
याच भागातील चंद्रभान ढिवर यांच्यावर 2006 पासून एक लाख 45 हजार 358 रुपये थकीत आहेत. लकडगंज येथील मीरा माधवराव ठाकरे व राजेश माधवराव ठाकरे यांनीही 2008 पासून मालमत्ता कर भरला नाही. त्यांच्याकडे एक लाख 51 हजार 378 रुपये थकीत आहे. याच भागातील विजय यादव यांच्याकडेही 2006 पासून मालमत्ता कर थकीत आहे. त्यांनाही आतापर्यंत अनेकदा नोटीस देण्यात आले. परंतु, त्यांनी थकीत 97 हजार 534 रुपये भरण्याकडे दुर्लक्ष केले. रामचंद्र मोहनकर यांच्याकडे 2003 पासून आतापर्यंत 73 हजार 931 रुपयांचा कर थकीत आहे. या सर्वांची मालमत्ता स्वतःच्या नावे करण्याचा पर्याय महापालिकेने निवडला. याबाबतचा प्रस्ताव 14 ऑगस्टला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possession of the property of the outstanding