नागपूर 38.1; आज-उद्या पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

उपराजधानीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पारा चार अंशांनी घसरल्याने नागपूरकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला.

नागपूर - उपराजधानीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पारा चार अंशांनी घसरल्याने नागपूरकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. पावसाळी वातावरण आणखी एक-दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

सोमवारी सायंकाळी वादळी पावसाने हजेरी लावल्यानंतर मध्यरात्री व सकाळीदेखील शहरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे कमाल तापमानातही चार अंशांची घसरण होऊन पारा 42 अंशांवरून 38.1 अंशांवर आला. एप्रिल महिन्यात प्रथमच तापमान चाळिशीच्या खाली आले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऱ्यात तीन ते सहा अंशांची घसरण झाली. यवतमाळ (4.6 मिमी), वर्धा (3.2 मिमी), चंद्रपूर (3.0 मिमी) व ब्रम्हपुरी (2.0 मिमी) या जिल्ह्यांतही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. विदर्भात पावसाळी वातावरण आणखी एक-दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर पुन्हा उन्हाची लाट अपेक्षित आहे. 

विदर्भात सरासरी पाऊस 
भारतीय हवामान विभागाने यंदा समाधानकारक पावसाचा दीर्घकालीन अंदाज वर्तवून देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली असून, विदर्भातही चांगला पाऊस राहणार असल्याची माहिती, प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी "सकाळ'ला दिली. देशभरातील ट्रेंड मध्य भारतातही कायम राहिल्यास विदर्भातदेखील दमदार पाऊस पडेल, अशी शक्‍यता त्यांनी वर्तविली. मात्र, विभागीय पातळीवरील पावसाचा अंतिम अंदाज मे महिन्याच्या अखेरीस व्यक्‍त करण्यात येणार असल्याने, त्यानंतरच पावसाचे अंतिम चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. हवामान विभागानुसार, नव्वद किंवा त्यापेक्षा अधिक टक्‍के पाऊस सरासरी मानला जातो. 

Web Title: Possibility of rain today-tomorrow