विदर्भात "हिवसाळा', नववर्षांत वाढणार थंडीचा कडाका

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

गेल्यावर्षी डिसेंबरच्या उत्तरार्धात विदर्भ चांगलाच गारठला होता. 29 डिसेंबरला नागपूरचा पारा तब्बल 3.5 अंशांपर्यंत घसरला होता. शतकातील सर्वांत कमी तापमानाची नोंद त्या दिवशी झाली होती. मात्र, यावर्षी कडाक्‍याच्या थंडीसाठी स्थिती अनुकूल नसल्याने आतापर्यंत पाहिजे तशी थंडी पडली नाही.

नागपूर : गतवर्षी शतकातील नीचांकी विक्रम अनुभवणाऱ्या वैदर्भींना कडाक्‍याच्या थंडीसाठी आणखी किमान आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्याचे ढगाळ वातावरण आणि उत्तरेकडून गारठायुक्‍त वारे विदर्भाच्या दिशेने येत नसल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा कडाका कमी जाणवत आहे. मात्र, नववर्षात थंडीसाठी अनुकूल वातावरण राहणार असल्यामुळे विदर्भ गारठणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. मंगळवारनंतर विदर्भात एक-दोन ठिकाणी हलक्‍या पावसाचीही शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

गेल्यावर्षी डिसेंबरच्या उत्तरार्धात विदर्भ चांगलाच गारठला होता. 29 डिसेंबरला नागपूरचा पारा तब्बल 3.5 अंशांपर्यंत घसरला होता. शतकातील सर्वांत कमी तापमानाची नोंद त्या दिवशी झाली होती. मात्र, यावर्षी कडाक्‍याच्या थंडीसाठी स्थिती अनुकूल नसल्याने आतापर्यंत पाहिजे तशी थंडी पडली नाही. यासंदर्भात हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांना विचारणा केली असता ते म्हणाले, साधारणपणे उत्तर भारतातील पहाडी भागांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली की, विदर्भात थंडीचा कडाका वाढतो. मात्र, यावर्षी स्थिती थोडी वेगळी दिसते आहे. 

क्लिक करा -  Video : चंद्रपूर जिल्ह्याच्या पोटात पेट्रोलचा साठा, काय आहे सत्य?

पावसाची शक्‍यता 
उत्तरेकडून अजूनही गारठायुक्‍त बोचरे वारे विदर्भाच्या दिशेने येत नसल्यामुळे तापमानात अपेक्षेप्रमाणे घट झाली नाही. परिणामत: थंडीचा कडाका वाढला नाही. या आठवड्यात कमीअधिक प्रमाणात वातावरण असेच राहण्याची शक्‍यता आहे. 25 डिसेंबरच्या आसपास विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊसही अपेक्षित आहे. विशेषत: गडचिरोली, चंद्रपूर व लगतच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्‍यता आहे. त्यानंतर पाऱ्यात हळूहळू घसरण होऊन डिसेंबरअखेर किंवा नववर्षात थंडीचा कडाका वाढणार आहे. गेल्या सहा डिसेंबरला नागपूरचा पारा यंदाच्या मोसमासह राज्यातही नीचांकी 10.6 अंशांपर्यंत घसरला होता. तो अपवाद वगळता या महिन्यात पारा 15 ते 20 अंशांदरम्यान राहिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: possiblity of Light rain in vidarbha region