टपाल खात्याची डीजिटल घोडदौड

मनीषा मोहोड
सोमवार, 30 डिसेंबर 2019

पोस्टाच्या नागपूर विभागात सध्या 32 लाखांहून अधिक खाती वापरात असून, विविध योजनांतील गुंतवणुकीतून सुमारे 200 कोटींच्या ठेवी जमा आहेत. पोस्टाच्या नागपूर विभागाअंतर्गत विदर्भातील 11 शाखा कार्यरत आहेत. यात 3 हजार 67 पोस्ट ऑफिस आहेत. 13 मुख्य आणि 380 उपमुख्य पोस्ट ऑफिस सुरू आहेत. यात विविध प्रकारची 32 लाख 12 हजार खाती सध्या वापरात आहेत.

नागपूर : व्यावसायिक आणि बॅंकिंग क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन पुरातन टपाल विभागानेही गेल्या वर्षभरात आपल्या डिजिटल व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले. परिणामी पुरातन टपाल विभागाचे रूपडे बदलत असून, नागरिकांनीही सुविधांमुळे या विभागाला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.
डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या मागणीने डाक विभागालाही बदलण्यास भाग पाडले. यावर्षी टपाल विभागाने आयपीपीबी अर्थात इंडियन पोस्ट पेमेंट बॅंकेच्या व्यवहारात आमूलाग्र बदल केले. आधुनिक युगाची गरज लक्षात घेऊन, ऑनलाइन व्यवहारासांठी आयपीपीबी ऍपची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. यासह, विविध आकर्षक ठेवींच्या योजना, ठेवींवर वाढीव व्याजदर, एका क्‍लिकवर सर्व ऑनलाइन व्यवहार, झिरो बॅलेन्स बचत खात्यांचे स्मार्ट कार्ड आणि घरपोच बॅंकिंग सेवा इत्यादी सुविधा दिल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात टपाल विभागाला यंदा यश आले आहे.

हे वाचाच - रपंचाचं पोरं मंत्री होतं तेव्हा

देशात पेपरलेस बॅंकिंग सुविधा नागरिकांना मिळावी व अर्थव्यवस्था कॅशलेस व्हावी, तसेच सर्वसामान्य जनतेला बॅंकिंग क्षेत्रात आणून देशातील ग्रामीण जनतेपर्यंत बॅंकिंग व्यवस्था पोहोचावी, या उद्देशाने भारतीय टपाल विभागाच्या वतीने "आपली बॅंक आपल्या दारी' हे घोषवाक्‍य घेऊन इंडियन पोस्ट पेमेंट बॅंकेची (आयपीपीबी) सुरुवात सप्टेंबर 2018 मध्ये केल्यानंतर, 2019 मध्ये या बॅंकेचे सर्व व्यवहार, स्मार्टफोनमार्फत, ऑनलाइन ऍपमार्फत करता येतील यावर भर देण्यात आला. आधुनिक बॅंकिंग व्यवसायात पदार्पण केल्याने टपाल विभागातील गुंतवणुकीचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आयपीबीपी, सुकन्या समृद्धी योजना, विविध प्रकारची खाती आणि बचत योजनांमुळे पोस्टातील गुंतवणुकीला प्रतिसाद मिळत आहे. पोस्टाच्या नागपूर विभागात सध्या 32 लाखांहून अधिक खाती वापरात असून, विविध योजनांतील गुंतवणुकीतून सुमारे 200 कोटींच्या ठेवी जमा आहेत. पोस्टाच्या नागपूर विभागाअंतर्गत विदर्भातील 11 शाखा कार्यरत आहेत. यात 3 हजार 67 पोस्ट ऑफिस आहेत. 13 मुख्य आणि 380 उपमुख्य पोस्ट ऑफिस सुरू आहेत. यात विविध प्रकारची 32 लाख 12 हजार खाती सध्या वापरात आहेत. या सर्व खात्यांमध्ये मिळून डिसेंबरअखेर 146 कोटी 45 लाख रुपयांची गुंतवणूक झाली. सुकन्या समृद्धी योजनेत वर्षअखेरीस पोस्टाच्या नागपूर विभागांतर्गत 2 लाख 52 हजार 575 खाती उघडण्यात आली आहेत.

पार्सल व्यवस्थेसह घरपोच सेवा

आधुनिक काळाच्या गरजेनुसार सर्वच क्षेत्रांत मोठा बदल घडून येत असताना टपाल विभागातही बदल घडणे साहजिकच आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून पत्राद्वारे जनतेची सेवा करणाऱ्या या विभागाचाही व्याप आता वाढला आहे. विमा योजना आणि बचत खात्याने सुरू झालेला हा बदल पुढे स्पीड पोस्ट, पोस्ट बॅंक, आधार केंद्र आणि पासपोर्ट सेवा केंद्राच्या कामांची यात भर पडली. नागरिकांची पत्रे पाठविण्याची सवय कमी झाली असली, तरी कॉर्पोरेट व सरकारी कामांसाठी रजिस्टर्ड पत्रे पाठविणे बंधनकारक असल्याने काम वाढले आहे. यासह नव्याने दाखल झालेल्या ऑनलाइन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पार्सल सेवांसह स्मार्टफोनधारक पोस्टमनला घरपोच पोस्टाच्या व्यवहाराची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Postal Account Digital Horse Racing