विधानसभेची निवडणूक पुढे ढकला ः रणजित देशमुख

विधानसभेची निवडणूक पुढे ढकला ः रणजित देशमुख
नागपूर ः महाराष्ट्रात पुरामुळे झालेले नुकसान बघता किमान पाच वर्षे पुनर्वसनासाठी लागू शकतात. आचारसंहिता लागल्यास पूरग्रस्तांना मदत करणे शक्‍य होणार नसल्याने आगामी विधानसभेची निवडणूक किमान एक वर्षांसाठी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लाऊन कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्राने एवढी भीषण पूरपरिस्थिती आजवर बघितली नाही. कोल्हापूर, सातारा, सांगलीसह चार ते पाच जिल्ह्यांतील संपूर्ण गावांनाच पुराचा फटका बसला आहे. नागरिकांचे घरदार वाहून गेले. जनावणे मृत पावली. जमीन खरडून निघाल्या. शेतांमध्ये पाचपाच फुट पाण्याचे डबके साचले आहे. अशी परिस्थिती पश्‍चिम महाराष्ट्रासह मुंबई, पालघर, नंदूरबार, गडचिरोली जिल्ह्यात आहे. विदर्भातील काही गावांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे पुनर्वसानाला मोठा कालावधी लागणार आहे. आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना बुटीबोरी पुरात वाहून गेले होते. तेथे पुनर्वसनासाठी पाच वर्षे लागले होते. याच्या पन्नासपट यंदा पाऊस झाला. अनेक जिल्हे संपूर्ण उध्वस्थ झाले आहेत.
आचारसंहिता उल्लंघनाची शक्‍यता
विधानसभेचा कालावधी संपत असल्याने नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात निवडणूक होऊ घातली आहे. निवडणूक जाहीर झाल्यास किमान दीड महिना आचारसंहितेत जाईल. आचारसंहितेत मदत करणे शक्‍य होणार नाही. संपूर्ण यंत्रणा निवडणुकीत व्यस्त राहील. मदत केल्यास आचारसंहितेचे उल्लंघन होईल तसेच यात भेदभाव होऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. यावर राष्ट्रपती राजवट लागू करून विधानसभेची निवडणूक एक वर्षे पुढे ढकलणे हा चांगला उपाय आहे. याकरिता आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शिवसेना नेते यांना निवदन देऊन विनंती करणार असल्याचेही रणजित देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com