शेगावात प्रगटदिनी लाखोंचा ‘भक्तीसागर’; हजारो दिंड्यांचे आगमन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

आज शनिवार (ता.15) ‘श्रीं’च्या 142 व्या प्रगटदिनासाठी विदर्भाच्या पंढरीत भक्ति भावनाचा जनसागर उसळला आहे. सकाळी दहा वाजता महारूद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती व ब्रम्हवृंदाच्या उपस्थित अवभृतस्नान झाले.

शेगाव (जि.बुलडाणा) : ‘गण गण गणात बोते’चा गजर करीत टाळमृदंगाच्या तालावर हजारोंच्यावर भजनी दिंड्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रगटदिनासाठी संत नगरीत दाखल झाल्या आहेत. राज्याच्या विविध भागातून भाविकांची गर्दी झाल्याने शेगावी ‘सोनियाचा दिनू’ अवतणार आहे. 

आज शनिवार (ता.15) ‘श्रीं’च्या 142 व्या प्रगटदिनासाठी विदर्भाच्या पंढरीत भक्ति भावनाचा जनसागर उसळला आहे. सकाळी दहा वाजता महारूद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती व ब्रम्हवृंदाच्या उपस्थित अवभृतस्नान झाले. त्यानंतर दुपारी 2 वाजता ‘श्रीं’च्या रजत मुखवट्यासह पालखी अश्‍व, गज, रथ, मेणा भगवे पताकीधारी वारकरी, ग. म. इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी यांच्यासह पालखी सोहळ्याची नगर परिक्रमा निघणार आहे.

हेही वाचा - एसीबीच्या हिटलिस्टवर आता दलाल

असा आहे नगरपरिक्रमा मार्ग
हा पालखी सोहळा मंदीर परीसर, जुने महादेव मंदिर परिसर, संत सावता चौक, तीन पुतडे, फुले नगर, तेलीपुरा, बंकट सदन, फरशीवेस, स्वामी विवेकानंद चौक, भैरव चौक, आठवडी बाजार, बस स्थानक मार्गे, महाराजा अग्रसेन चौक, शिवाजी महाराज चौक, लोकमान्य टिळक चौक, गांधी चौक, जुने मंदिर रोड मार्गे नगर परिक्रमा करिता ‘श्रीं’चा पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. ता.16 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 7 ते 8 काल्याचे कीर्तन  हभप प्रमोदबुवा राहणे पळशी यांच्या होईल व या प्रगटदिन उत्सावाची सांगता होणार आहे. 

हजारो पायी दिंड्या दाखल
मुखी गजाननाचे नाम घेऊन ‘श्रीं’च्या प्रगटदिन उत्सावात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश या ठिकाणाहून शेकडो किलोमीटरवर पायी वारी करून भजनीदिंड्या दाखल होत आहे.  गजानन अवलीया अवतरले जग तराया, ज्ञानबुवा तुकारामचा नामघोष करित शेगाव शहरात भजनी दिंड्या भक्तिभावाने दाखल होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pragatdin festival in shegaon