गडकरींसारखा खासदार लाभणे भाग्याचे - प्रमोद सावंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

नितीन गडकरी यांच्यासारखा नेता लाभणे भाग्याचे आहे. नागपूरमध्ये त्यांनी तब्बल 70 हजार कोटींची विकासकामे केली आहेत. गोवा राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी 15 हजार कोटी उपलब्ध करून दिले, असे सांगून त्यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे आपण मुख्यमंत्री होऊ शकलो, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. 

नागपूर - नितीन गडकरी यांच्यासारखा नेता लाभणे भाग्याचे आहे. नागपूरमध्ये त्यांनी तब्बल 70 हजार कोटींची विकासकामे केली आहेत. गोवा राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी 15 हजार कोटी उपलब्ध करून दिले, असे सांगून त्यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे आपण मुख्यमंत्री होऊ शकलो, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. 

गडकरी यांच्या प्रचारार्थ सावंत यांची शुक्रवारी कुंभारटोली येथे सभा आयोजित केली होती. भाजपच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात स्वच्छ भारत अभियान, अंत्योदय योजना, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना, विमा योजना अशा विकास योजना राबविण्यात आल्या. नितीन गडकरी यांनी देशभरातील सागरी मार्ग व रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याने देशाच्या विकासाला गती मिळाली, असे सावंत म्हणाले. 

देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. सोबतच देशासाठी नितीन गडकरी यांना केंद्रात पाठविणे गरजेचे आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून निराधारांना निवारा मिळाला. शौचालय, अंत्योदय योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मोठा दिलासा दिला. मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे. दहशतवादी हल्ल्याचा बदला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून घेतला. दुसरीकडे यूपीए सरकारच्या काळात नुसते घोटाळे झाले. सबका साथ, सबका विकास यासाठी पुन्हा भाजपच्या हातात देशाची सत्ता द्यावी, असे आवाहन सावंत यांनी केले. 

या वेळी आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर, नगरसेविका मनीषा धावडे यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, प्रमोद पेंडके, महेंद्र राऊत, हितेश जोशी, चंदन गोस्वामी, नामदेव ठाकरे, जी. पी. शर्मा, नरेश चिटफाडे, दत्तू पारसकर, प्रमोद भोवते आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक हितेश जोशी यांनी संचालन केले.

Web Title: Pramod Sawant has said that it is a fate to get leader of Nitin Gadkari