'पीआरसी'ने उडविली विभागप्रमुखांची झोप, फेब्रुवारीत समिती दौऱ्यावर

श्रीकांत पेशट्टीवार
Wednesday, 27 January 2021

सकाळी दहा ते साडे या वेळेत समितीचे सदस्य जिल्ह्यातील विधान मंडळाच्या सदस्यांशी शासकीय विश्रामगृहात अनौपचारिक चर्चा करतील. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

चंद्रपूर : पुढील महिन्यात पंचायतराज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. समितीचा दौरा निश्‍चित झाल्यापासून जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांची झोप उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विभागप्रमुखसह कर्मचाऱ्यांची धावपळ वाढली आहे. रविवारी अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर येत असून प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत.

हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

पंचायतराज समिती येत्या नऊ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात येत आहे. तीन दिवस या समितीचा जिल्ह्यात मुक्काम असेल. आमदार संजय रायमुलकर अध्यक्ष असलेल्या या समितीत प्रदीप जयस्वाल, कैलास पाटील, डॉ. राहुल पाटील, अनिल पाटील, संग्राम जगताप, दिलीप बनकर, शेखर निकम, सुभाष धोटे, माधवराव जळगावकर, प्रतिभा धानोरकर, हरिभाऊ बागडे, डॉ. विजयकुमार गावित, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, डॉ. संजय कुटे, राणा जगजितसिंग पाटील, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, निरंजन डावखरे, सुरेश धस यांचा समावेश आहे. विशेष निमंत्रित म्हणून किशोर पाटील, जयंत पाटील, बाळराम पाटील आणि किशोर दराडे यांचा समावेश आहे. नऊ फेब्रुवारीला या समितीचे आगमन होईल.

हेही वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला

सकाळी दहा ते साडे या वेळेत समितीचे सदस्य जिल्ह्यातील विधान मंडळाच्या सदस्यांशी शासकीय विश्रामगृहात अनौपचारिक चर्चा करतील. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात 2010-11 ते 2016 ते 2017 च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी साक्ष घेतील. त्यानंतर काही पंचायत समित्यांना समिती भेट देणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना भेटी देतील. पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांचे साक्ष घेतील. 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या 2011 - 12 ते 2017 -18 या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य अधिकाऱ्यांशी साक्ष घेतील. पंचायतराज समिती येणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख प्रलंबित कामे, अहवाल, रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ करीत आहे. सुटीच्या दिवशीही रात्र उशिरापर्यंत कामे उरकणे सध्या सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prc committee visit to chandrapur zp in february