esakal | मेळघाटात गर्भवती मातामृत्यूचे सत्र सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnant Women

मेळघाटात गर्भवती मातामृत्यूचे सत्र सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अचलपूर : रेहट्याखेडा येथील सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा 'भूमका'कडे उपचारात वेळ वाया गेल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मेळघाटात आरोग्यावर अंधश्रद्धा भारी पडल्याचे दिसून येत आहे.

चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रेहट्याखेडा गावातील हिरू बेठेकर या सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राप्त माहितीनुसार, हिरू बेठेकर ही रेहट्याखेडा गावातील असून, ती मागील एक-दीड महिन्यापासून गावात नव्हती. ती काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या खडीमल गावात तिच्या आईकडे होती. सदर महिला गर्भवती असल्यापासून तिला अंगावर रक्त जात होते. गावात असेपर्यंत तिच्यावर उपचार करण्यात आले, अशी माहिती रेहट्याखेडा येथील सुदायिक आरोग्य अधिकारी दीपक कुंडेटकर यांनी दिली. मात्र, गावातून गेल्यापासून त्या महिलेने वैद्यकीय उपचाराकडे दुर्लक्ष करीत भूमकाच्या उपचाराला महत्त्व दिले. यामध्ये तिची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली.

हेही वाचा: पोळा सणानिमित्त परभणीची बाजारपेठ सजली

अखेर मेळघाटमध्ये नुकतेच झोन अभियान राबविण्यात आले. त्यावेळी सदर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना निदर्शनास आली. तिला ३१ ऑगस्टला काटकुंभ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. नंतर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेला अमरावती रेफर केले. मात्र, डफरिन रुग्णालयात पोचताच महिलेने अखेरचा श्वास घेतला.

भूमकाचा बंदोबस्त करण्याची गरज

मागील आठवड्यात चुरणी गावातील भूमकाकडे उपचार केल्याने स्तनदा मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तिसऱ्या दिवशी एका बालकाचा मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यू भूमकाकडे उपचार करण्यात वेळ वाया गेल्याने झाल्याची माहिती समोर आली आहे. आता सहा महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता आरोग्य विभागाने भूमकांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

प्रकृती चिंताजनक असल्याने कर्मचाऱ्यांनी महिलेला आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तिची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने तिला अचलपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तिथल्या डॉक्टरांनीसुद्धा अमरावती रेफर केले. रुग्णालयात पोचताच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

- डॉ. राजेश्री माहुलकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ.

या महिलेचा मृत्यू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच झाला होता. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशाने झाला याची माहिती नाही.

- डॉ. मंगला सूर्यवंशी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, डफरिन रुग्णालय, अमरावती.

loading image
go to top