ती नऊ महिन्यांची गर्भवती अन्‌ प्रसूती वेदना झाल्या असह्य, होणाऱ्या बाळासाठी...

pregnant walk for delivery at gadchiroli
pregnant walk for delivery at gadchiroli

भामरागड (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील बिनागुंडा गावाच्या पलीकडे असलेल्या तुर्रेमर्का येथील रोशनी संतोष पोदाडी या महिलेला शुक्रवारी (ता. 3) प्रसूतीकळा सुरू झाल्या. परंतु, अतिशय दुर्गम भाग असल्याने या परिसरात आजही मूलभूत सुविधांचा वानवा आहे. प्रसूतीकळा असह्य होत असूनही तिच्या गावात ना रुग्णवाहिका येऊ शकली ना कुठले वाहन मिळू शकले. प्रसूतीच्या वेदना असह्य होत असल्याने तिने मनाशी गाठ बांधली आणि... 

घरातील गर्भवतींची एरवी खूप काळजी घेतली जाते. लहान-सहान गोष्टींकडे जातीने लक्ष दिले जाते. गर्भवतीला कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असतात. कारण, गर्भवती व बाळ दोघेही सुखरूप राहावे हा या मागील उद्देश असतो. मातेसह बाळाच्या जिवाला कोणताही धक्‍का पोहोचायला नोको यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी कुटुंबीयांची असते. मात्र, सोयी-सुविधांचा अभाव असलेल्यांचे हे स्वप्न मात्र स्वप्नच राहते.

हेही वाचा - जादूटोणा केल्याचे भूत डोक्‍यात शिरले अन्‌ सांभोरा गावात घडले भयाण खुनी नाट्य...

भामरागड तालुक्‍यातील एका गावातील रहिवासी असलेल्या रोशनी पोदाडी हिला प्रसती वेदला सुरू झाल्या. मात्र, गाव दुर्गम भागात असल्याने रुग्णवाहिका येऊ शकली ना कुठले वाहन मिळू शकले. पोटात बाळ, प्रसव वेदना सहन करीत तिने तब्बल 23 किमीचे अंतर पार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेने तिने हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे रुग्णालय गाठले. त्याच दिवशी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे हे दुसरे बाळंतपण होते. 

प्रसूतीनंतर पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. 7) रोशनीला सुटी झाली. लोकबिरादरी रुग्णालयाने तिला गावी सोडून देण्यासाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयाला माहिती दिली. तेथून रुग्णवाहिका आली. सोबत डॉ. संभाजी भोकरे हेसुद्धा होते. त्या रुग्णवाहिकेने रोशनीसह तिचे बाळ, कुटुंबातील सदस्य आणि गावाकडून सोबत आलेली आशासेविका पार्वती उसेंडी निघाले. परंतु, लाहेरीच्या पुढे गुंडेनूर नाल्यापर्यंतच त्यांचे वाहन जाऊ शकले. पुढील 23 किलोमीटरचा प्रवास त्यांना पायीच करावा लागला.

अनेक महिला प्रसूतीनंतर सव्वा महिन्यापर्यंत घराबाहेर निघत नाही. परंतु, गडचिरोली जिल्ह्यात रोशनीसारख्या अनेक महिलांना प्रसूतीनंतर असे अग्निदिव्य करावे लागते. विशेष म्हणजे त्यात सात ते आठ किलोमीटर अंतर हे डोंगरदऱ्यांचे आहे. इतक्‍या लांब पायी चालून येणाऱ्या गर्भवतीला किमान जाताना प्रसूतीनंतर तरी आरामदायक प्रवास करून गावी जाता येईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु, वाहनाअभावी तिला परतीच्या प्रवासातही तेवढेच 23 किलोमीटरचे अंतर चालत जावे लागले. 

जग बदलले पण...

गडचिरोली जिल्ह्यात निसर्गाने मुक्‍तहस्ते उधळण केली आहे. परंतु, सतत नक्षलाच्या सावटाखाली राहणाऱ्या या भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यातील अनेक गावांचा महिनोमहिने संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे साध्या साध्या गोष्टींसाठी नागरिकांनी पायपीट करावी लागते. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक नागरिक, वृद्ध, माता, चिमुकले गतप्राण होतात. जग बदलले पण, भामरागडमधील नागरिकांचे जीवनमान व त्यांच्या समस्या बदलल्या नाहीत, हेच या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. 

महाराष्ट्राला नक्‍कीच ही बाब शोभणारी नाही

महिलेला नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर बाळंत होण्यासाठी तब्बल 23 किलोमीटर व बाळंत झाल्यानंतर पाच दिवसांनी स्वगावी येण्यासाठी पुन्हा तेवढेच अंतर कापावे लागले. अशी एकूण 46 किलोमीटरची पायपीट महिलेला करावी लागली. एक प्रसूत महिलेला एवढे मोठे अंतर पायी कापावे लागणे ही पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला नक्‍कीच शोभणारी नाही.

हिरकणीने तोंड देत आव्हान केले पूर्ण

गर्भवतीने तुर्रेमर्का ते लाहेरीपर्यंत 23 किलोमीटरचा प्रवास पायीच केला. तिने ठरवले आणि सोबत एकीला घेऊन प्रसूतीच्या वेदना सहन करीत पायीच निघाली. पसूतीच्या पाच दिवसांनी पायीच घराकडे यावे लागले. आपल्या तान्हुल्यासाठी या आधुनिक हिरकणीने अनेक समस्यांना तोंड देत आव्हान पूर्ण केले. भामरागड तालुका व आदिवासी भागातील गर्भवतींच्या नशिबी आयुष्यभर हेच राहील का, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होतो. 

(संपादन - नीलेश डाखोरे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com