पावसाचे पाणी संकलित करा : पंतप्रधान

रूपेश खैरी
बुधवार, 19 जून 2019

वर्धा : यंदा पाणीटंचाईमुळे अख्खे राज्य होरपळून निघत आहे. सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाणीप्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आवश्‍यक आहे. यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले आहे. ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांसमक्ष त्याचे जाहीर वाचन करण्याचे कळविण्यात आले आहे.

पाणीटंचाईवर मात करण्याकरिता येत्या काळात पावसाच्या पाण्याचे संकलन हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येकाने त्यासाठी नियोजन करणे अनिवार्य झाले आहे. केवळ ग्रामीणच नाही तर शहरी भागातही पावसाच्या पाण्याचे संकलन होणे गरजेचे आहे. याकरिता पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा होत आहे. राज्यभर या संदर्भात अनेक कामे सुरू आहेत. यात आता खुद्द प्रंतप्रधानांनी पत्र पाठविल्याने या विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पाणी बचत करण्याकरिता पंतप्रधानांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. यात जास्तीत जास्त पाण्याचे संकलन करण्याकरिता शेताची बांधबंदिस्ती करणे, नदी व ओढ्यात चेकडॅम तयार करणे, तटबंदी करणे, तलावाचे खोलीकरण करणे, गाळ साफ करणे, तसेच वृक्षारोपण आणि टाके, तळी निर्माण करून पाण्याचे संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
22 ला विशेष ग्रामसभेत वाचन
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्याचे वाचन जिल्ह्यातील 524 ग्रामपंचायतींत 22 जूनला करण्यात येणार आहे. तशा सूचना आणि सोबत पत्राची प्रत रवाना करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prime minister appeal to save rain water