'डिजिधन' होणार 'निजी धन' - पंतप्रधान मोदी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विष प्राशन करून सामान्यांवर अमृताचा वर्षाव केला. त्यामुळे दीक्षाभूमीतून नव्या अर्थव्यवस्थेस प्रारंभ करीत असल्याचे नमूद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "भीम' ऍपमुळे देशाची अर्थव्यवस्था महाबली होणार असल्याचा विश्‍वास व्यक्‍त केला. भविष्यात "डिजिधन' लोकांचे "निजी धन' बनणार असून, ते भ्रष्टाचारविरोधातील लढाईचे प्रमुख अस्त्र ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

नागपुरातील मानकापूर येथील क्रीडासंकुलात आयोजित नीती आयोगाच्या डिजिधन मेळाव्याच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
मोदी यांनी या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दीक्षाभूमी यावरील टपाल तिकीट, "भीम रेफरल' योजनेच्या लोकार्पणासह ट्रिपल आयटी, "आयआयएम' आणि "एम्स' या शिक्षण संस्थांचा पाया रचला. त्यांनी एका स्क्रीनवर अंगठा लावून "भीम-आधार' सेवेचा प्रारंभ केला.

याशिवाय राज्यातील 20 शहरांत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील पहिल्या टप्प्यातील 40 हजार घर बांधकामाचे उद्‌घाटन केले. मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री राजकुमार बडोले, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या.

मोदी म्हणाले, 'मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार डिजिटल इंडियावर गांभीर्याने काम आहे. कमीत कमी रोख रकमेचा वापर केल्याने चांगले परिणाम येतात, या साध्या व जुन्याच विचारांना व्यवहारात आणण्याचा प्रयत्न आहे. या बदलाचा प्रत्येकाने स्वीकार करावा. नोटा छापणे, त्या सुरक्षितपणे नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी अब्जावधीचा खर्च येतो. हा खर्च टाळल्यास गरिबांसाठी घरे होतील. ही योजना शक्‍य असल्यानेच पुढाकार घेतला आहे. कमी रोख व्यवहारामुळे मोबाईलच "एटीएम' होणार असून, भविष्यात बॅंकांमधील गर्दी कमी होईल. भविष्यात "भीम-आधार' योजनेसाठी इतर देशही भारताकडे मागणी करतील. जगातील मोठमोठ्या देशांतील विद्यापीठे या योजनेवर पीएच.डी. करायला येतील. तरुणांनी या क्रांतीचे सैनिक बनावे.''

"भीम-आधार' रोजगार योजना
पंतप्रधान मोदी यांनी आजपासून ते 14 ऑक्‍टोबरपर्यंत "भीम-आधार' योजनेअंतर्गत तरुणांना रोजगाराच्या नव्या विशेष रेफरल योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत एका तरुणाने "भीम-आधार' ऍपबाबत एखाद्या व्यक्तीला प्रशिक्षित केले, प्रशिक्षित व्यक्तीने "भीम-आधार' योजनेद्वारे तीनदा व्यवहार केल्यास त्या तरुणाच्या खात्यात दहा रुपये जमा होतील. अशा प्रकारे एखाद्या तरुणाने दररोज 20 लोकांनाही या योजनेशी जोडल्यास त्याला प्रतिदिन दोनशे रुपये मिळतील. जे व्यापारी दुकानात ग्राहकांकडून "भीम-आधार' ऍपद्वारे व्यवहार करतील, त्यांच्या खात्यात 25 रुपये जमा होतील. या योजनेतून रोजगार मिळवत, तरुणांना त्यांच्या शिक्षणाचा खर्चही पेलता करता येईल, असे मोदी म्हणाले.

विरोधकांनाही टोलेबाजी
कॅशलेस किंवा लेस कॅश योजनेला विरोध करणाऱ्या विरोधकांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाळीस मिनिटांच्या भाषणातून टोला लगावला. कुणाचेही नाव न घेता त्यांनी मोठमोठ्या विद्वानांनी या योजनेला विरोध केल्याचे सांगितले. संसदेत अनेकांनी यावर वाद केला. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला. परंतु, जे समजून घेत नाही, त्यांना काय समजावणार, असे ते म्हणाले. शेवटी "भीम-आधार' ऍपला अंगठ्याची जोड दिल्याचे सांगितले. आम्ही अंगठ्याच्या बळावर भारताला ताकदवान करणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: prime minister in nagpur dikshabhumi