खेळाडूंना निकृष्ट जेवण देणाऱ्या प्राचार्यांना हटविले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

नागपूर : मानकापूर येथील क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंना निकृष्ट जेवण देणे तसेच शिवीगाळ व मारहाण करणे, प्राचार्यांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पुढील आदेशापर्यंत प्राचार्य सुभाष रेवतकर यांना तत्काळ पदावरून हटविले. आता त्यांच्या जागी जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड हे प्रभारी प्राचार्य म्हणून काम पाहणार आहेत. इतकेच नव्हे, खेळाडूंना जेवण पुरविणाऱ्या भोजनालयावरही (मेस) टर्मिनेशनची कारवाई सुरू केली आहे.

प्रबोधिनीच्या खेळाडूंनी मंगळवारी भल्या पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करून जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्राचार्यांच्या मनमानीचा पाढा वाचला होता. त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन देत प्राचार्यांवर कारवाईची मागणी केली होती. प्रबोधिनीत मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबद्दल खेळाडूंनी प्राचार्य सुभाष रेवतकर यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, प्राचार्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी उलट खेळाडूंनाच दमदाटी केली होती. इतकेच नव्हे, प्राचार्यांनी खेळाडूंना अश्‍लील भाषेत शिवीगाळ आणि मारहाणसुद्धा केली होती, असा खेळाडूंचा आरोप आहे. वारंवार तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने प्रबोधिनीतील सर्व खेळाडूंनी सोमवारी सायंकाळी मानकापूर पोलिस ठाणे गाठून लेखी तक्रार नोंदविली. तिथेही न्याय मिळत नसल्याचे बघून संतप्त खेळाडूंनी अखेर आज पहाटे साडेपाचला जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांनी आपबीती सांगितली.
जिल्हाधिकारी मुद्‌गल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लगेच जिल्हाधिकारी कार्यालयातील एक टीम घटनास्थळी रवाना केली. अधिकाऱ्यांनी प्रबोधिनीतील भोजनालय, जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था व क्रीडा साहित्याची तपासणी केली. तपासणीत येथील वॉटर फिल्टर बंद असल्याचे तसेच खेळाडूंना शुद्ध पाणी मिळत नसल्याचे लक्षात आले. निवास व्यवस्थेतही अनेक त्रुटी आढळून आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पुणे येथील क्रीडा आयुक्‍तांशी चर्चा करून प्रबोधिनीतील वास्तव लक्षात आणून दिले. अखेर क्रीडा आयुक्‍तांच्या आदेशानुसार रेवतकर यांना तातडीने पदावरून हटविण्यात आले. तसेच त्यांच्या जागी जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. पुढील आदेशापर्यंत रेवतकर यांना प्रबोधिनीच्या दैनंदिन कारभारात कसलाही हस्तक्षेप न करण्यास बजावण्यात आले आहे. याशिवाय भोजनालय बंद करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. येथील भोजनालय बंद झाल्यानंतर कंत्राट दुसऱ्या व्यक्‍तीला देण्यात येणार आहे. मानकापूर पोलिसही या प्रकरणी चौकशी करीत आहे. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर रेवतकर यांच्यावर कारवाई होऊ शकते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Principal deleted news