esakal | "ओव्हरटेक'च्या नादात खासगी बसला अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

भिवापूर ः "ओव्हरटेक'मुळे झालेल्या अपघातातील खासगी बस.

"ओव्हरटेक'च्या नादात खासगी बसला अपघात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवापूर (जि.नागपूर):  समोर जात असलेल्या टिप्परला "ओव्हरटेक' करण्याच्या नादात चालकाचा अंदाज चुकल्याने भरधाव खासगी बस टिप्परच्या मागील बाजूला धडक देत रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उलटता उलटता वाचली. सुदैवाने यादरम्यान वेळात रस्त्याने दुसरे वाहन न आल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथील साईसमर्थ पेट्रोल पंपाजवळ घडली.
या अपघातात बसमधील 8 ते 9 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. खासगी बस प्रवासीभरून नागपूरवरून वडसा येथे भरधाव जात असताना दुर्घटना घडली. बसमधील सागर बलकी नामक प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, बसचालक हा फार वेगाने बस चालवीत होता. काही प्रवाशांनी त्याला बसची गती कमी करण्याची विनंतीसुद्धा केली; परंतु त्याने दुर्लक्ष केले. अशातच येथील समर्थ पेट्रोल पंपाजवळ समोर जात असलेल्या टिप्परला "ओव्हरटेक' करण्याचा प्रयत्न बसचालकाने केला. परंतु, बस भरधाव असल्याने त्याचा अंदाज चुकला. बस टिप्परच्या मागील भागाला घासून विरुद्ध दिशेला रस्त्याच्या खाली उतरली. तिथे असलेल्या झाडामुळे बस उलटण्यापासून वाचली. सुदैवाने यादरम्यान अन्य वाहन न आल्याने मोठी दुर्घटना टळली. अचानक घडलेल्या या घटनेत आठ ते नऊ प्रवाशांना किरकोळ मार बसला. घटनेनंतर अपघातास जबाबदार असलेल्या बसचालकाला प्रवाशांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यांचा रोष बघून घाबरलेल्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
बसचालकांचा आगाऊपणा जीवघेणा
नागपूरवरून सुटणाऱ्या खासगी बसच्या भिवापूरमार्गे पवनी, ब्रह्मपुरी, गडचिरोली, वडसा, मूल, सिंदेवाही, आरमोरी येथे दररोज शेकडो फेऱ्या होतात. एसटीच्या तुलनेत खासगी बसचे भाडे कमी पडत असल्याने प्रवाशांचा ओढा खासगीकडे अधिक असतो. परंतु, खासगी बसच्या सुसाट वेगाने बस हाकण्याच्या सवयीमुळे या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव बसमधून उतरेपर्यंत टांगणीला असतो. यापूर्वी खासगीच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून, त्यात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागला. चालकांच्या या आततायीपणावर अंकुश लावण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

loading image
go to top