esakal | गोंदिया शहरात आता हे डॉक्टर करणार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार...वैद्यकीय अधिष्ठातांचे पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना रुग्णसंख्या लवकरात लवकर कमी व्हावी, रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, याकरिता कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोंदिया शहरातील खासगी डॉक्‍टरांच्या सेवा घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

गोंदिया शहरात आता हे डॉक्टर करणार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार...वैद्यकीय अधिष्ठातांचे पत्र

sakal_logo
By
मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील खासगी डॉक्‍टरांच्या सेवा घेण्याचा निर्णय अखेर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे यांनी तसे कार्यालयीन पत्र काढले आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्याचे खासगी डॉक्टरांना सोयीचे झाले आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८४४ झाली आहे. यामध्ये प्रयोगशाळा चाचणीतून ६७२, रॅपिड अँटिजन चाचणीतून १६६ आणि ६ रुग्ण बाहेर जिल्हा व बाहेर राज्यात आढळले आहेत.

क्रियाशील रुग्णांची संख्या २२१

जिल्ह्यातील एकूण क्रियाशील रुग्णांची संख्या २२१ वर पोहोचली आहे; तर सहा रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहेत. १८ ऑगस्टपर्यंतची ही आकडेवारी असली; तरी दररोज बाधित रुग्णांची वाढती संख्या जिल्हा प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढविणारी आहे.

जाणून घ्या : दैव बलवत्तर म्हणून... उपचारासाठी एकटीला नागपूरला हलवले, तेव्हापासून बेपत्ता; दीड महिन्यांनी आली ही बातमी


नियम व अटी पायदळी

अनलॉक सुरू झाल्यापासून लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेचा फायदा घेत अनेकजण जिल्हा प्रशासनाने लादलेले नियम व अटी पायदळी तुडवीत आहेत. आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही सोशल डिस्टंसिंगचे पालन होताना दिसत नाही. सॅनिटायझरही गायब झाले आहे. परिणामी, रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे.

रुग्णसंख्या कमी व्हावी

त्यामुळे ही संख्या लवकरात लवकर कमी व्हावी, रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, याकरिता कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोंदिया शहरातील खासगी डॉक्‍टरांच्या सेवा घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे यांनी एक कार्यालयीन परिपत्रक काढले आहे. जिल्ह्यातील खासगी तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सेवा कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर गोंदिया येथे घेण्यात येणार आहेत.

अधिक वाचा : नक्की कसे होतात किन्नरांवर अंत्यसंस्कार? काय आहेत प्रथा आणि परंपरा.. एकदा वाचाच

‍हे डॉक्‍टर देतील सेवा

२० ऑगस्ट रोजी डॉ. अमित जयस्वाल, २१ ऑगस्टला डॉ. जितेंद्र गुप्ता, २२ ऑगस्टला डॉ. चितवन सूद, २३ ऑगस्टला डॉ. पुष्पराज गिरी, २४ ऑगस्टला डॉ. राजेंद्र वैद्य, २५ ऑगस्टला डॉ. संजय अग्रवाल, २६ ऑगस्टला डॉ. संजय येडे, २७ ऑगस्टला डॉ. उषा अग्रवाल, २८ ऑगस्टला डॉ. विनोद मोहबे, २९ ऑगस्ट डॉ. हेमल शहा, ३० ऑगस्ट डॉ. एस. रत्नपारखी, ३१ ऑगस्ट डॉ. मनीष गुप्ता, १ सप्टेंबर डॉ. पमेश गायधने, २ सप्टेंबर डॉ. दर्पण चौधरी आणि ३ सप्टेंबर रोजी डॉ. अनुराग बाहेकर यांच्या सेवा वर नमूद केलेल्या दिवशी सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजतापर्यंत उपलब्ध राहणार आहेत.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image
go to top