खासगी रुग्णालयातील लुटीला मनपाने असा लावला चाप!

corona
corona

चंद्रपूर : कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयात गेला, की तेथे त्याची लूट सुरू होते. नाना प्रकारची भिती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. शासकीय दरांनुसार ८० हजार रुपये बिल झाले असताना, पाच-सात लाख रुपये उकळल्याचे प्रकार नागपुरात उघडकीस आले होते. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारत ती रक्कम रुग्णांच्या खात्यात जमा करण्यास रुग्णालय प्रशासनाला भाग पाडले होते. चंद्रपुरातही हा प्रकार सुरू झाल्याने पालिका प्रशासनाने कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या देयकांचे अंकेक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू आहे. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली. या पार्श्‍वभूमीवर चंद्रपूर शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेव्यतिरिक्त खासगी रुग्णालय अवाजवी दराने देयक आकारून रुग्णांना लुटत आहेत.

रुग्णांना दाखल करतानाच आगाऊ रकमेची मागणी केली जात आहे. याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. यावर आळा घालण्यासाठी महानगर पालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली. ते खासगी रुग्णालयातील देयकांचे अंकेक्षण करतील. यापुढे कोरोना बाधित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचारानंतर देयक मनपाने नेमून दिलेल्या अंकेक्षण अधिकाऱ्याने प्रमाणित केल्याशिवाय अंतिम होणार नाही. या आदेशाचे पालन करणे प्रत्येक खासगी रूग्णालयात बंधनकारक राहणार आहे.

सतरा सदस्यांची चमू
शासन निर्धारित दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी गरजेचे आहे. खासगी रुग्णालयांमध्ये निर्धारित दरानुसार आकारणीची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागातील दोन अधिकारी आणि 17 कर्मचाऱ्यांची चमू नियुक्त केली आहे.

शासन निर्धारित दर आणि खासगी रुग्णालयाच्या दरात तफावत आढळली तर संबंधित डॉक्‍टरांवर कारवाई केली जाईल, असे महापौर राखी कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांनी स्पष्ट केले.


संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com