esakal | लाँकडाऊनमध्येही गावठी दारूचे अड्डे या जिल्ह्यात जोरात; पोलिसांनी दाखवले चौदावे रत्न
sakal

बोलून बातमी शोधा

liquor

पोलिसांची व्यस्तता आणि दारूची मागणी ही संधी साधून शहरालगतच्या गावांमध्ये अनेकांनी गावठी दारू गाळण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुक्तिपथ गाव संघटनांकडून हा प्रकार कळताच तालुका चमूने पोलिसांना याची माहिती देत चार गावांतील गावठी हातभट्ट्यांवर छापा टाकला.

लाँकडाऊनमध्येही गावठी दारूचे अड्डे या जिल्ह्यात जोरात; पोलिसांनी दाखवले चौदावे रत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिरोंचा (जि. गडचिरोली)  : विदेशी दारूची आवक बंद झाल्यामुळे सध्या सिरोंचा तालुक्‍यात गावठी दारू गाळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा चोरून लपून दारू गाळणाऱ्या चार गावांतील तब्बल 14 हातभट्ट्यांवर पोलिसांच्या सहकार्याने छापे टाकून मुक्तिपथ गाव संघटना व तालुका चमूने तब्बल 70 हजाराचा मुद्देमाल व गावठी दारू जप्त केली.
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्‍याला छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने तेथून कुणीही तालुक्‍यात दाखल होऊ नये, यासाठी सिरोंचा पोलिस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्याचबरोबर लोकांनी लॉकडाऊन पाळण्याचे आवाहनही केले जात आहे. परिणामी तेलंगणा राज्यातून होणारी विदेशी दारूची तस्करी कमी झाली आहे. पोलिसांची व्यस्तता आणि दारूची मागणी ही संधी साधून शहरालगतच्या गावांमध्ये अनेकांनी गावठी दारू गाळण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुक्तिपथ गाव संघटनांकडून हा प्रकार कळताच तालुका चमूने पोलिसांना याची माहिती देत चार गावांतील गावठी हातभट्ट्यांवर छापा टाकला. अरडा गावात एका घरी छापा टाकून 10 लिटर दारू जप्त करून तब्बल 5 हजाराचा मुद्देमाल व साहित्य नष्ट केले. सूर्यरावपल्ली या गावात तब्बल 6 ठिकाणी छापा टाकून 8 ड्रम गुळाचा सडवा व इतर साहित्य, असे 40 हजारांचे साहित्य नष्ट केले. पाच जणांवर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. मददीकुंटा या गावी 6 ठिकाणी छापा टाकून पोलिस व मुक्तिपथ चमूने 15 लिटर दारू जप्त केली. तिघांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर जानमपल्ली येथे एका घरी छापा टाकून जमिनीत गाडलेला चार ड्राम गुळसडवा नष्ट केला. तब्बल 20 हजारांचा मुद्देमाल यावेळी सापडला.

सविस्तर वाचा - अरे हे काय झालं; पोलिसदादांची धावपळ सुरू अन् अंगावर उठला  काटा

दारू गाळण्यासाठी लागणारा गुळही महागला असल्याने गाळली जाणारी दारूही चढ्या भावाने विकली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन पाळून अवैध धंदे बंद करण्याची तंबी यावेळी पोलिसांनी दारू गाळणाऱ्यांना दिली. पोलिस निरीक्षक अजय अहीरकर, पोलिस उपनिरीक्षक गजानन शिंदे, शीतल दविली आणि सेलोकर यांच्या मार्गदर्शनात  कारवाई करण्यात आली.

loading image