जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सडलेली संत्री फेकून आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सडलेली संत्री फेकून आंदोलन

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे परतीच्या पावसाने पिकांची नासाडी झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतानाच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आमचे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला. 
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पिकांच्या नासाडीचे नमुने, कापूस, सोयाबीन, धान, संत्रा आदी आणले होते. हे नमुने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारत पिकांचे नमुने, झेंडे नेता येणार नाही, नारे देता येणार नाहीत अशा सूचना दिल्या. पोलिसांच्या सूचनांना न जुमानता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. आंदोलनकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी शेतकरी नेते राम येवले यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, काही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पोलिसांच्या ताफ्याने प्रवेशद्वारावर त्यांना अडविल्यामुळे त्या ठिकाणी सडलेली संत्री, भाजीपाला, सडलेली कापसाची झाडे आदी टाकत नारेबाजी केली. या आंदोलनामध्ये मुकेश मासुरकर, सुनील वडस्कर, वृषभ वानखेडे, वसंत वैद्य, प्रभाकर बेले, मोहन पाटोडे, विजय मोदेकर, पुखराज रेवतकर, विनायक खोरगडे, भैयालाल माकडे सहभागी झाले होते. 

पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, धान, संत्रा आदी पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. मात्र, प्रशासनातर्फे अजूनही पंचनामे करण्यात आले नाहीत. अधिकार नसलेले भाजप, सेनेचे नेते शेतावर जाऊन फोटोसेशन करीत आहेत. तर, काही नेते मुख्यमंत्र्यांच्या संगीतखुर्चीच्या डावपेचात अडकले आहेत. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. 
-राम येवले, मुख्य संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com