घरी परतण्याच्या ओढीने सोशल डिस्टंन्सिंग वाऱ्यावर, आरोग्य तपासणीसाठी झुंबड

irwin
irwin
Updated on

अमरावती : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने बाहेरचे अनेक लोक जिल्ह्यामध्ये अडकले आहेत. त्यांना त्यांच्या गावाला परत जाण्यासाठी पोलिस विभागाकडून परवानगीपूर्वी आरोग्य तपासणी करणे आवश्‍यक करण्यात आले. त्यामुळे रविवारी (ता. 3) इर्विनमध्ये तपासणीसाठी येणाऱ्यांची झुंबड उडाली. त्यातून सोशल डिस्टंन्सिंग वेशीला टांगल्या गेली. विशेष म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार आवाहन करण्यात आल्यावरसुद्धा नागरिक शिस्त पाळत नसल्याचे दिसून आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्दी, ताप, खोकल्यासह संसर्गजन्य आजारासाठी मागील दीड महिन्यापासून एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. नोंदणी केल्यानंतर संबंधित पेंडॉलमध्ये लागलेल्या रांगेतून तपासणी कक्षात जावे लागते. रविवारी सकाळी साडेसहा ते सात वाजतापासून कॉटनमार्केटमध्ये काम करणारे जवळपास पन्नासच्या आसपास मजूर आणि नागपुरीगेट, खोलापुरीगेटसह इतरही भागातील नागरिक एकाचवेळी आरोग्य तपासणीसाठी रांगेत लागले. त्यामुळे पेंडॉल तर खचाखच भरलाच, शिवाय बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कक्ष सुरू होण्यापूर्वीच गर्दीला आवरणे तपासणी कक्षात असलेल्या परिचारिका, कर्मचारी आणि डॉक्‍टरांना शक्‍य झाले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याने ध्वनिक्षेपकावरून सोशल डिस्टंन्सिंग पाळा, प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केले. परंतु वारंवार आवाहन केल्यावरसुद्धा त्याला कुणीच दाद देत नव्हते. गर्दी नियंत्रणात राहावी, नागरिकांनी विशिष्ट अंतर ठेऊन उभे राहावे यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनीसुद्धा आवाहन केले. त्यानंतरसुद्धा शेकडो लोक गर्दी करीतच उभे होते. काहींना बाहेर जिल्ह्यात तर, अनेकांना बाहेर राज्यामध्ये जायचे होते.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात, राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रवास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. शहरात यायचे असल्यास पोलिस आयुक्तांची तर ग्रामीण भागासाठी पोलिस अधीक्षकांची अनुमती घ्यावी लागेल. वेबसाइटवर नाव नोंदणीपूर्वी आरोग्य तपासणी बंधनकारक आहे. महाराष्ट्राबाहेर किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येण्यासाठी वेगळी लिंक दिल्या गेली आहे.
दरम्यान, इर्विनमध्ये झालेल्या गर्दीच्या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची व्हीसी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सविस्तर वाचा - तुम्ही रोगयुक्‍त फळे तर खात नाही ना?
दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
नाव नोंदणीसाठी आयुक्तालयाचे क्षेत्र वगळून ग्रामीण क्षेत्राकरिता उपजिल्हाधिकारी राजेश अडपवार, आयुक्तालयासाठी उपायुक्त यशवंत सोळंके, या व्यतिरिक्त ज्या व्यक्तींना महाराष्ट्राबाहेर जावयाचे असेल किंवा परराज्यातून जिल्ह्यात यावयाचे असेल, त्यांच्यासाठी उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर यांची जिल्हा प्रशासनाने नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.
गर्दी वाढण्याची शक्‍यता
नागरिकांच्या सुविधेसाठी नियम शिथिल करण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या काळात आरोग्य तपासणी करण्यासाठी इर्विनमध्ये येणाऱ्यांची गर्दी वाढण्याचीच शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com