वडेट्टीवारांच्या मतदारसंघात पुगलियांची दावेदारी!

file photo
file photo

चंद्रपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातून माजी खासदार नरेश पुगलिया यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी या विधानसभा क्षेत्रातून पक्षाकडे उमदेवारीसुद्धा मागितली आहे. त्यामुळेच मागील 35 वर्षे विधानसभा निवडणुकीपासून दूर असलेल्या पुगलियांचा थेट वडेट्टीवार यांच्या क्षेत्रातील शिरकाव राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारा ठरला आहे. शिवसेनेतून 2006 मध्ये विजय वडेट्टीवारांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून वडेट्टीवारांची जिल्हा कॉंग्रेसवरील पकड मजबूत होत गेली. त्यांनी पुगलियांचे खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडली नाही. आता ते विरोधी पक्षनेते झाले आहेत. दुसरीकडे 1978, 80 मध्ये आमदार म्हणून पुगलिया चंद्रपुरातून निवडून गेले. 1984 मध्ये पक्षाने त्यांची तिकीट कापली. मात्र त्यांना पक्षाने 1986 मध्ये राज्यसभेत पाठविले. या काळात जिल्ह्याच्या राजकारणात पुगलियांचा दबदबा होता. 1992 मध्ये राज्यसभेची त्यांची मुदत संपली. याकाळात ते दिल्लीत चांगलेच स्थिरस्थावर झाले होते. त्यांनी राज्याच्या राजकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवले. 1996 ला लोकसभेची उमेदवारी पक्षाने नाकारली. तेव्हा पुगलियांनी बंडखोरी केली. मात्र 1998 मध्ये पुगलियांवर कॉंग्रेसने विश्‍वास दाखविला. 1998, 99 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर 2004, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुगलियांचा पराभव आणि वडेट्टीवारांचा कॉंग्रेसमधील उदयाचा काळ एकच. त्यामुळे दोघांचीही पक्षावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी चढाओढ सुरू झाली. यातूनच त्यांच्यात संघर्ष निर्माण व्हायला लागला. त्यांच्या कमालीचे वितुष्ट आले. या काळात वडेट्टीवार राज्यमंत्री झाले. त्यांची पक्षावरील पकड आणखी मजबूत झाली. पुगलियांना 2009 नंतर पक्षाने उमदेवारी दिली नाही. त्यांचा मुलगा राहुल पुगलिया यांना विधान परिषद आणि विधानसभेची उमेदवारी दिली. त्यांचाही पराभव झाला. पक्षांतर्गत गटबाजीमुळे पुगलिया आणि त्यांच्या मुलाला पराभवाचे चटके सहन करावे लागले. तेव्हापासून वडेट्टीवार यांच्याविषयी पुगलियांच्या मनात कमालीची नाराजी आहे. अनेकदा एकमेकांशी जुळवून घेण्याचा दोघांचाही प्रयत्न अयशस्वी झाला. आता 2019 लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल, अशी पुगलियांना अपेक्षा होती. मात्र येथेही 2014 ची पुनरावृत्ती झाली. यावेळी तर थेट शिवसेनेचे बाळू धानोरकर यांना वडेट्टीवारांच्या पुढाकाराने लोकसभेची उमदेवारी मिळाली ते विजयी झाले. राहुल गांधी यांच्या जाहीरसभेपासूनही पुगलियांना दूर ठेवण्यात आले. यामुळे दुखावलेल्या पुगलियांनी थेट वडेट्टीवार यांनाच आव्हान देण्याचे ठरविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com