बारूदच्या साठ्यावर पुलगाव

पुलगाव - सोनेगाव (आबाजी) येथील बॉम्ब निकामी करण्याच्या मैदानावर ठेवलेल्या मुदतबाह्य बॉम्बच्या पेट्या.
पुलगाव - सोनेगाव (आबाजी) येथील बॉम्ब निकामी करण्याच्या मैदानावर ठेवलेल्या मुदतबाह्य बॉम्बच्या पेट्या.

देवळी (जि. वर्धा) - पुलगाव दारूगोळा भांडाराच्या सोनेगाव (आबाजी) येथील बॉम्ब निकामी करण्याच्या मैदानावर मंगळवारी (ता. २०) घडलेल्या घटनेमध्ये कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे पुढे आले आहे. भांडाराच्या कर्मचाऱ्यांना ट्रकमधून बॉम्बच्या पेट्या काढण्यापासून खड्ड्यांमध्ये बॉम्ब टाकणे व ते नष्ट करण्याचे काम करायचे असते; मात्र हे जोखमीचे काम अप्रशिक्षित मजुरांकडून करवून घेतले जात असल्याचे उघड झाले आहे. या  संपूर्ण प्रक्रियेत गलथानपणा, बेफिकिरी आणि असुरक्षितता अधोरेखित होते.

दारूगोळा नष्ट केल्यावर तांबा, पितळ, लोखंड गोळा करण्याचे कंत्राट पुलगाव येथील अशोक चांडक व शंकर चांडक यांना दिला आहे. दारूगोळा नष्ट करण्याकरिता ट्रकसोबत १० ते १५ कर्मचारी येतात. ट्रकमधून बॉम्बच्या पेट्या काढणे आणि खड्ड्यांपर्यंत नेण्याचे आणि नष्ट करण्याचे काम कर्मचाऱ्यांचे असते. त्यांच्यासोबत देखरेखीकरिता एक प्रमुख कर्मचारीही असतो. मात्र, हे काम कर्मचारी करीत नाही. तांबे, पितळ गोळा करण्याकरिता जे मजूर जातात, त्यांच्याच हाताने हे जोखमीचे काम करून घेतले जाते. एका खड्ड्यापर्यंत १० ते १२ व्यक्ती बॉम्बची  पेटी नेतात. खड्डा खोदणे, त्यात बॉम्ब ठेवणे अशी सर्व कामे हे मजूर करतात. एकावेळी सुमारे ३०० ते ४०० पेट्यातील बॉम्ब नष्ट करण्यात येतात. बॉम्ब नष्ट केल्यावर ठेकेदारास एका खड्ड्यातील १७५ किलो पितळ व ३०० किलो लोखंड देऊन उर्वरित पितळ व लोखंड मजुरांनी घ्यावे, असा करार असतो. त्यामुळे बॉम्ब नष्ट करतेवेळी सुमारे १०० मजूर या कामाकरिता नेहमीच या क्षेत्रात येतात. 

तांबा, पितळ, लोखंड गोळा करण्याकरिता आलेल्या मजुरांकडूनच सर्व कामे करवून घेतली जातात. या ठिकाणी भांडाराचे कर्मचारी कोणतेच काम करीत नाही. परिणामी, येथे अशा घटना वारंवार घडतात. यापूर्वी, अशा अनेक घटना घडल्या आहेत; पण या घटनांची दखलच घेण्यात आली नाही. बॉम्ब नष्ट करण्याचा परिसर सोनेगाव (आबाजी) गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या परिसराला जामणी, केळापूर, चिकणी, देवळी, सोनेगाव, मुरदगाव, येसगाव या गावांच्या सीमा लागून आहेत. येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने तांबे, पितळ, लोखंड वेचण्याकरिता येतात. गोळा केलेले साहित्य परिसरातच खरेदी करणारे व्यावसायिक आधीच तयार असतात. यातून प्रत्येकाला ५०० ते १००० रुपये मिळतात. या लोभापायी लगतच्या गावांतील हजाराच्या वर महिला-पुरुष येथे येतात.

माहिती दारूगोळा भांडाराची
 पुलगाव हे देशातील सर्वात मोठं व आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्र भांडार आहे
 पुलगावात दारूगोळा बनवला जातोच, शिवाय मोठा शस्त्रसाठाही ठेवला जातो.
 सेनेच्या तीनही दलांसाठी लागणारे बॉम्ब, दारूगोळा अशी मोठी युद्ध सामग्री इथं साठवली जाते
 देशाच्या विविध ठिकाणी तयार झालेली स्फोटकं पुलगाव लष्करी तळावर साठवली जातात
 पुलगावात जवळपास २०० अधिकारी आणि सुमारे ५ हजार स्थानिक कामगार काम करतात
 पुलगावचा शस्त्रसाठा परिसर किंवा दारुगोळा भांडार हा २८ किमीचा परिसर आहे. त्यामुळे या परिसराला मोठं सुरक्षाकवच असतं.
 या परिसरात जवानांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
 इथे शस्त्रसाठ्यासाठी अनेक बंकर केले जातात, यातील प्रत्येक बंकरमध्ये जवळपास ५ हजार किलोपर्यंतचा शस्त्रसाठा असतो.

सुदैवाने भीषण स्फोट टळला
बॉम्बपेटी नेताना ती पडल्याने स्फोट झाला. यादरम्यान, बॉम्बमधील एक काडतूस बॉम्बने भरलेल्या ट्रकच्या टायरमध्ये घुसले व टायर पंक्‍चर झाला. हे काडतूस ट्रकमधील बॉम्ब पेट्यांना लागले असते तर भीषण स्फोट घडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. घटना घडताच जबलपूर भांडारातील कर्मचारी पांगले. बॉम्ब पेट्या गोळा करण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. काही बॉम्ब खड्ड्यांत पेरण्यात आले होते. त्यामुळे ते नेमके कुठे आहे, याचा शोध घेतल्यावर पेट्या उचलण्यात येणार होत्या. काही पेट्या खड्ड्यांच्या बाहेर होत्या, त्या कर्मचाऱ्यांनी गोळा केल्या. खड्ड्यांमध्ये पुरलेले बॉम्ब शोधण्याकरिता बॉम्बशोधक पथक बोलावण्यात आले. हे पथकही उशिराने दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांची धावपळ 
घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. लगेच जखमींना सावंगी  रुग्णालयात पोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी ठाणेदार दिलीप ठाकूर, उपनिरीक्षक  श्री. शिरपूरकर, श्री. ठमके व सहकाऱ्यांनी धावपळ केली. अपर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. कोल्हे यांनीही घटनास्थळी येऊन परिस्थिती हाताळली. त्यापाठोपाठ तहसीलदार श्री. बांबर्डे, नायब तहसीलदार श्री. देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि पुलगाव दारूगोळा भांडारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी सावंगी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.  

घरांना बसतात हादरे 
या क्षेत्रात नेहमी बॉम्ब नष्ट करण्याचे काम सुरू असते. काही वेळा शक्तिशाली बॉम्ब नष्ट केले जातात. त्यामुळे परिसरातील गावांत घरांना हादरे बसतात. अनेकदा घरांना तडेही जातात. ३१ मे २०१६ ला घडलेली भीषण घटना बॉम्ब पडल्यानेच घडली होती. त्यावेळी १९ अधिकारी आणि जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. लगतच्या गावांमध्ये नेहमीच नुकसान होत असले तरीही कोणत्याच प्रकारची मदत ग्रामस्थांना दिली जात नाही. या परिसरातील गावे नेहमीच बॉम्ब फोडण्याच्या घटनांनी दहशतीत असतात.

तंत्रज्ञानाचा मृत्यू 
या स्फोटात मरण पावलेले उदयवीर सिंग हे मध्य प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यातील खमरिया ऑर्डनन्स फॅक्‍टरीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. ते मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यातील चंदोशी या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा मृतदेह मूळगावी पाठविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेण्यात येत आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख
वर्धा - जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडार परिसरात झालेल्या स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले. गंभीररीत्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी दोन लाख, तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने भेट घेत चर्चा केली. या चर्चेदरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना व जखमींना वरीलप्रमाणे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एक समिती गठित करण्यात यावी व समितीने एका महिन्यात सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व आयुधनिर्माणी कारखान्यांच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षेसंबंधीच्या व्यवस्थांचा अभ्यास करून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

‘दुर्घटनांना आळा घाला’
पुलगाव दारूगोळा भांडारात अंतर्गत अचानक स्फोट होऊन घडणाऱ्या दुर्घटना चिंताजनक असून, यामुळे परिसरातील गावांचे व नागरिकांचे जीवन धोक्‍यात आले आहे. या घटनांची केंद्र शासनाने योग्य ती दखल घ्यावी व या घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आघात प्रतिसाद टीम सक्रिय  
स्फोटातील जखमींना सकाळी पावणेआठदरम्यान सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या प्रशासनाने लगेच आघात प्रतिसाद टीम सक्रिय करून जखमींवर तातडीने औषधोपचार सुरू केले. या घटनेतील जखमींपैकी प्रभाकर वानखेडे आणि राजकुमार भोवते यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. उर्वरित रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, सर्व तज्ज्ञ डॉक्‍टर त्यांची काळजी घेत आहेत. गंभीर जखमी झालेल्या  चौघांना आणीबाणीच्या शस्त्रक्रियेसाठी घेतलेले आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक परिस्थितीचे निरीक्षण करीत आहेत. दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले, सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी डॉ. उदय मेघे, डॉ. चंद्रशेखर महाकाळकर आणि कुलपती दत्ता मेघे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com