संयुक्त कारवाई अशी की, नियम मोडणाऱ्यांच्या काळजात भरली धडकी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन व संचारबंदी आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.

मोताळा (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यानुषंगाने मोताळा शहरात महसूल, नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने बुधवारी संयुक्तपणे कारवाईची मोहीम राबविली. यावेळी फेस मास्क न वापरणाऱ्या 51 व्यक्ती व नियम मोडणाऱ्या 20 दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन व संचारबंदी आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोना या महामारीला हद्दपार करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर आपत्कालीन उपाययोजना राबवीत आहे. परंतु काही जण नियमांना तिलांजली देऊन बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. नियम मोडणाऱ्या बहाद्दरांना धडा शिकविण्यासाठी तहसीलदार व्ही. एस. कुमरे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे, पोलिस निरीक्षक माधवराव गरुड व एपीआय राहुल जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी मोताळा शहरात संयुक्तपणे मोहीम राबविली.

हेही वाचा - ‘त्यांनी’ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा मी राजकीय सन्यास घेईन! कोण म्हणाले पहा!

यावेळी सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रुमाल न वापरणाऱ्या 51 व्यक्तींवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करून 5650 रुपयांचा दंड वसूल केला. सोबतच बोराखेडी पोलिसांनी 20 दुचाकी चालकांवर विविध कारणांमुळे दंडात्मक कारवाई केली. काही अतिउत्साही दुचाकी चालकांना दंडुक्‍याचा प्रसाद देण्यात आला. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांच्या काळजात धडकी भरली आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आवश्‍यक वाचा - जिल्हाधिकारी म्हणाले, नावालाच उघडतात दवाखाने...

गुरुवारी शंभर टक्के लॉकडाउन पाळला
लॉकडाउन पूर्वी मोताळा येथे गुरुवारी आठवडी बाजार भरत होता. त्यामुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांना येथील आठवडी बाजाराचे वळण पडले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी गुरुवारी मोताळा शहरातील दवाखाने, औषधालय व बॅंका वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले होते. त्यामुळे गुरुवारी मोताळा शहरात शंभर टक्के लॉकडाउन पाळण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punitive action against two-wheelers who do not wear face masks and break the rules in buldana