बलात्काराच्या आरोपींचे जातपंचायतकडून शुद्धीकर

Rape
Rape

नागपूर - वाडीतील २५ वर्षीय गतिमंद मुलीवर दोन नातेवाइकांनीच अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या आरोपींवर फौजदारी कारवाई होणे अपेक्षित असताना जातपंचायतने शुद्धीकरण करून घेत त्यांच्या पापावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. या अमानवी घटनेसंदर्भात शिवसेनेच्या विधान परिषदेतील प्रतोद नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून येणाऱ्या काळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटणार आहेत.

व्यंकटेश पप्सलेटी (३२) रा. गरवाल, करनुल, तेलंगणा आणि रामू गोपाल बोई (२६) रा. सोलापूर रोड, उस्मानाबाद अशी आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी मूळची तेलंगणाची रहिवासी आहे. कामाच्या शोधात तिचे आई-वडील २० वर्षांपूर्वी नागपुरात आले. हे कुटुंब वाडी परिसरात वास्तव्यास असून आई चहाची टपरी चालविते. तिच्या लहान बहिणीचे लग्न झाले आहे. आरोपींपैकी व्यंकटेश हा पीडितेच्या आईचा चुलत भाऊ तर रामू भाचा आहे. दोघांचेही नेहमीच पीडितेकडे जाणे-येणे होते. तरुणी दुपारी एकटीच घरी राहत होती. दोन्ही आरोपी एप्रिल २०१८ पासून तिच्यावर अत्याचार करीत होते. तिला दिवस गेल्याने आरोपींच्या पापाचे भांडे फुटले. 

घटनेची वाच्यता झाल्यानंतर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र आले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर जातपंचायत बोलावण्यात आली. तेलंगणा आणि वाडीतही जातपंचायत पार पडल्या. जातपंचायतसमोर आरोपींनी पापाची कबुली देत बाळंतपणाचा खर्च करण्याची कबुली दिली. पण, पैसे मात्र दिले नाहीत. तरुणी सध्या आठ महिन्यांची गर्भवती असून आरोपींकडून मदत न मिळाल्याने आईने शुक्रवारी वाडी ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणाची नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या मागण्या 
- या प्रकरणाची वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी.
- जातपंचायतीच्या पंचाच्या घटनांचा विभागीय आढावा घेण्यात यावा.
- जातपंचायतींचा कायदा लागू असला तरी याची अंमलबजावणी करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण गृह राज्यमंत्री आणि पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून प्रत्येक महिन्याला जातपंचायतीच्या घटनांची माहिती घेऊन कारवाई करण्यात यावी.

आज बैठक
बलात्काराच्या आरोपींना पोलिसांकडे देण्याऐवजी जातपंचायतीकडून शुद्धीकरण करण्यात आले. या प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना प्रत्यक्ष निवेदन दिले आहे. या प्रकरणावर बुधवारी (ता. ६) रणजित पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अशी पार पडली जातपंचायत
प्राप्त माहितीनुसार, २९ ऑक्‍टोबर २०१८ रोजी देशाच्या विविध भागांतून पंच आले. त्याच दिवशी या तिघांना शुद्ध करून घेण्याची ही तथाकथित प्रक्रिया पार पडली. आरोपी वेंकटेश आणि रामू यांच्यासह पीडित तरुणी आणि रामूची पत्नी या चौघांना सुकलेल्या फांद्यांना आग लावून त्या जळत्या फांद्यांच्या खालून ७ फेऱ्या मारायला लावण्यात आल्या. यानंतर एका महिन्यात तुमच्या मुलीचे लग्न लावून देऊ, असे आश्वासन देऊन पंच परतले. पीडिता आता आठ महिन्यांची गरोदर आहे. तिचा गर्भपात होणेही शक्‍य नसल्याने तिचे आयुष्य उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com