'पूस प्रकल्प'ला पर्यटन विकासाची मोठी संधी...पर्यटकांच्या गर्दीतही झाली वाढ

file photo
file photo

पुसद (जि. यवतमाळ) : ऑगस्टच्या मध्यात तालुक्‍यातील वनवार्ला येथील अप्पर पूस प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आणि पर्यटकांची एकच गर्दी 'पूस' वर जमली. कोरोना काळात घरात कंटाळलेली माणसे 'वसंतसागर'चे तुडुंब भरलेले रूप पाऊससरीत न्याहाळताना आनंदित झाली. सध्या या प्रकल्पाच्या दगडी भिंतीवरून "ओव्हरफ्लो' सुरूच आहे. निसर्गरम्य पूस प्रकल्पाचा हा सुंदर नजरा डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे 'पूस प्रकल्प'ला पर्यटन विकासाची मोठी संधी आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकारातून या धरणाची मुहूर्तमेढ रोवली. पूस नदीवरील या प्रकल्पामुळे हा परिसर हिरवेगार झाला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण झालेले निसर्गसौंदर्य अनुभवता यावे, यादृष्टीने या प्रकल्पांवर पर्यटन क्षेत्राचा विकास केल्यास या आधुनिक तीर्थक्षेत्राकडे पर्यटकांना वारी नक्कीच करता येईल. ही बाब लक्षात घेऊन पुसद पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अविनाश भगत यांनी 'पूस प्रकल्प पर्यटन विकास'चा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर गेल्याच आठवड्यात सादर केला.

जलसंपदा विभागाचे अमरावती येथील मुख्य अभियंता ए. एन. बहादुरे यांनी पुढाकार घेत या प्रस्तावाला गती दिली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूरचे कार्यकारी संचालक यांनी हिरवी झेंडी दिल्यास या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने वसंतसागर जलाशयात नौकाविहार, उद्यान, लहान मुलांची खेळणी, कारंजे, विद्युत रोषणाई, उपहारगृह, शुद्ध पेयजल आधी सुविधा निर्माण करण्यात येतील.

विश्रामगृहाला मिळावे पुनरुज्जीवन

पूस धरणाच्या निर्मितीनंतर धरणालगत उंच टेकडीवर विश्रामगृह बांधण्यात आले. दोन मुख्यमंत्री व सातत्याने मंत्रीपद पुसदला लाभल्याने या विश्रामगृहात एकेकाळी मोठी चहलपहल होती. परंतु काळानुरूप या विश्रामगृहाकडे दुर्लक्ष झाले. येथील चौकीदार व खानसामा निवृत्त झाल्यानंतर नवीन भरती करण्यात आलेली नाही. विश्रामगृहाचे पुनरुज्जीवन पाटबंधारे विभागाला करता येणे शक्‍य आहे. परंतु या विश्रामगृहासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे.

...तर पर्यटनाचे नवीन दालन

उमरखेड पाटबंधारे विभागातील अंबोना तलाव सध्या पर्यटन विकासाच्या प्रक्रियेत आहे. जवळपास साडेतीन कोटी रुपयांची तरतूद यावर करण्यात आली आहे. पुसद तालुक्‍याला इंद्रनील नाईक, निलय नाईक, डॉ. वजाहत मिर्झा असे तीन आमदार लाभले आहेत. लोकप्रतिनिधींनी पर्यटन विकास कामात पुरेपूर लक्ष घातले तर पूस प्रकल्पात पर्यटनाचे नवीन दालन उघडले जाऊ शकते.


अतिउत्साहींचा बंदोबस्त आवश्‍यक

सद्यःस्थितीत पूस प्रकल्पावर पर्यटकांची गर्दी उसळली असताना काही अतिउत्साही तुडुंब भरलेल्या जलाशयात उड्या घेत आहेत. तर काही दगडी भिंतीच्या बाजूने वानर उड्या मारत आहेत. सुरक्षा नावाची व्यवस्था येथे नाही. एकट्या-दुकट्या सुरक्षा रक्षकाला कुणी ऐकत देखील नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता टाळता येत नाही. या दृष्टीने पाटबंधारे विभागाने अतिउत्साही पर्यटकांचा बंदोबस्त करावयास हवा.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com