esakal | पुसद: तलाठी ते सहाय्यक वनसंरक्षक आशिषची उंच भरारी ! । Success
sakal

बोलून बातमी शोधा

पुसद: तलाठी ते सहाय्यक वनसंरक्षक आशिषची उंच भरारी !

पुसद: तलाठी ते सहाय्यक वनसंरक्षक आशिषची उंच भरारी !

sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद : "कलेक्‍टर व्हायचं मनाशी ठरवलं...तयारीसाठी दिल्ली गाठली. यशाच्या पायर्‍या निसरड्या झाल्यात. बान्सीत परतलो. महसूल विभागात तलाठी झालो. मात्र, प्रयत्न सोडला नाही, राज्यसेवा परीक्षेसाठी अभ्यासाचा फोकस वाढवला आणि लहानपणीचे वनाधिकारी बनवण्याचे स्वप्न अखेर फळाला आले."

पुसद तालुक्यातील बान्सी येथील आशिष उज्ज्वल देशमुख 'सकाळ'शी बोलत होते.आशिष यांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य वनसेवा ही परीक्षा महाराष्ट्रात सहाव्या गुणवत्ता क्रमाने उत्तीर्ण केली. सहाय्यक वनसंरक्षक ( एसीएफ ) प्रथम श्रेणी अधिकारी या पदासाठी त्यांची निवड झाली. सध्या ते पुसद तालुक्यातील भंडारी साजाचे तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या या यशस्वी भरारीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा: पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच

आशिष यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कोषटवार शाळेत झाले.बारावी विज्ञान परीक्षा फुलसिंग नाईक महाविद्यालयातून २००८ मध्ये उत्तीर्ण केली. अमरावती विद्यापीठाच्या केमिकल इंजीनियरिंग विभागातून बी.टेक. पदवी संपादन केली. त्यांनी काही काळ खाजगी नोकरी केली. पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

आशिष म्हणाले- " बारावी पर्यंत मी बॅकबेंचर्स होतो. बी. टेक. करताना नागरी सेवा सारख्या उच्च ध्येयाने प्रेरित झालो व २०१२ मध्ये पदवी पूर्ण होताच यूपीएससीची नवी दिल्लीला तयारी केली. परंतु यश मिळाले नाही. राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात परतलो. सतत दोन वर्ष प्रयत्न केलेत. मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचलो. मात्र, यशाने हुलकावणी दिली. मन रमले नाही. प्रयत्न सुरूच होते. अशातच २०१९ मध्ये तलाठी परीक्षा उत्तीर्ण केली व 'प्लॅन बी' म्हणून स्वीकारली."

हेही वाचा: महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर

ध्येय उच्च ठेवावे, अपयशाने खचून जाऊ नये, यशाचा मार्ग खाचखळग्यांचा असतो. अभ्यासातील सातत्य, धीर व कठोर प्रयत्न यातून यशाचा मार्ग सुकर होतो, हे सांगताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी उमेद बाळगावी,असा सल्ला दिला. परीक्षेतील यशाच्या हुलकावणीमुळे बरेचदा डिप्रेशन येते, याची कबुली देतानाच नेहमी सकारात्मकता ठेवावी,यावर त्यांनी भर दिला.

राज्य वनसेवेकडे का वळलात ? या प्रश्नाच्या उत्तरात आशिष म्हणाले -" जंगलाने वेढलेल्या बान्सी गावात बालपण गेले.वनांबद्दल आकर्षण निर्माण झाले.जीवनदायी वनांचे संवर्धन व्हावे, हा विचार वन सेवेसाठी मला प्रेरक ठरला." या परीक्षेच्या मुलाखतीत माझ्या वनाबद्दलच्या संकल्पना पॅनेलने जाणून घेतल्या. जंगल शेजारच्या गावातील वन्यजीव व मानव यातील संघर्ष कसा टाळता येईल, याबद्दल माझे मत तज्ज्ञांसमोर व्यक्त केले,असे आशिष यांनी सांगितले.

आशिषचे वडील भाऊराव चव्हाण साखर कारखान्यात प्लॅन इन्चार्ज तर आई उषा गृहिणी आहे.त्यांचे दोनच महिन्यापूर्वी लग्न झाले असून अर्धांगिनी 'मेघनाचा पायगुण चांगला लाभला', या त्यांच्या कुटुंबातील अभिप्रायाबद्दल आशिष खुश आहेत.

loading image
go to top