निकाल बघून बसला विद्यार्थिनीला धक्का

कुरखेडा : संस्कृती दहीकर या विद्यार्थिनीचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
कुरखेडा : संस्कृती दहीकर या विद्यार्थिनीचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.

कुरखेडा : बोर्डाच्या गलथान कारभाराचा एका हुशार विद्यार्थिनीला मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला. शालांत परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी "कही खुशी, कहीं गम', असा अनुभव घेत असताना परीक्षा दिलेल्या कुरखेड्याच्या एका विद्यार्थिनीला गैरहजर दाखविल्याचे कळताच धक्का बसला. संस्कृती सुरेश दहीकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कुरखेडा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये शिकत होती. यंदा तिने दहावीची परीक्षा दिली. शिवाजी हायस्कूल येथेच तिचे परीक्षा केंद्र (केंद्र क्रमांक 1953) होते. तिने सर्व विषयांचे पेपर दिले होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी (ता. 8) दहावीच्या निकालाची घोषणा केली. मात्र, गुणपत्रकावर मराठी विषयात "अनुपस्थित' दाखविण्यात आल्याचे दिसताच संस्कृतीला धक्का बसला. तिने ही बाब आपल्या शिक्षकांना सांगितली. त्यांनी संस्कृतीची समजूत काढत ही चूक परीक्षा मंडळाची असल्याचे सांगितले.
संस्कृती ही हुशार मुलगी असून, तिला गणितात 83, सामाजिक विज्ञान विषयात 83, विज्ञान व तंत्रज्ञान विषयात 75, इंग्रजीत 54 व हिंदीत 55 गुण आहेत. मराठी विषयातही आपणास किमान 55 गुण मिळाले असते, असे तिचे म्हणणे आहे. मात्र, पेपर देऊनही अनुपस्थित दर्शविल्याने संस्कृती प्रचंड निराश झाली आहे. संस्कृतीचे वडील वनरक्षक असून, आई अंगणवाडीसेविका आहे. तिच्या सर्वांत मोठ्या बहिणीने एम.एस.सीचे शिक्षण पूर्ण केले. दुसरी बहीणदेखील एमएससी करीत आहे. हुशार विद्यार्थिनीवर असा प्रसंग ओढवला असेल, तर सर्वसामान्य विद्यार्थिनींचे काय, शिक्षण मंडळ आपली चूक दुरुस्त करून देईल काय, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
परीक्षेतील गैरप्रकाराकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकाराला प्रोत्साहन मिळते. मात्र याकडे शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सामूहिक कॉपीला प्रोत्साहन मिळत आहे. शिक्षकांची कमी, शैक्षणिक कार्याकडे कानाडोळा केला जात असतानाही मागील काही वर्षात निकालाची टक्केवारी घसरत चालली आहे. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com