प्रेरणादायी...! पुलाने केला नाला जिवंत

File photo
File photo

नेर (जि. यवतमाळ) : दिवसेंदिवस नदी-नाले कोरडे पडत आहेत. पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. यावर मात करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवीत आहे. जलयुक्त शिवारवर कोट्यवधी खर्च होऊनही जलसंधारण झाल्याचे दिसत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन प्रयोग करून नाल्यावरील पुलांचा उपयोग जलसंधारणासाठी होऊ शकतो हे दाखवून दिले आहे. जलसंधारणासाठी पुलाचा यशस्वी वापर करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा प्रयोग पहिलाच असावा, असे मानले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागानेही जलसंधारणाच्या क्षेत्रात काम करावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव यांच्या पुढाकारात चंद्रपूर येथे प्रशिक्षण घेण्यात आले होते. शिबिराला अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हटले की रस्ते, इमारती किंवा पूल बांधणे, एवढेच मर्यादित लक्ष्य असते. मात्र, हे पूल बांधताना त्या पुलाखाली "पूल-कम-बंधारा' बांधला तर जलसंधारण मोठ्या प्रमाणात होऊ शकते, ही मूळ संकल्पना या शिबिराची होती. यातूनच "इलिप्टीकल शेप'मध्ये "पूल-कम-बंधारा' बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात मात्र नेर तालुक्‍यातून झाली, हे विशेष. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपलीकर, अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, मुख्य अभियंता प्रशांत नवघरे यांच्या मार्गदर्शनात नेर उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी-1 भूपेश कथलकर आणि सहाय्यक अभियंता श्रेणी 2 हर्षद ठाकरे यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. पिंपरी कलगा ते मारवाडी या रस्त्यावर एक करोड 83 लाख रुपयांच्या पुलाचे निर्माण करण्यात आले. या पुलाखाली एक मृत नाला होता. बाजूला असलेल्या वाळकी येथील तलावाचे झिरपणारे पाणी या नाल्यातून जात होत. मात्र, तो नाला पावसाळ्यातच कोरडा व्हायचा. दीड फूट खोल आणि बारा मीटर रुंद असलेल्या या नाल्याला जिवंत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. सुरुवातीला हा नाला दोन मीटर खोल करण्यात आला. त्याची रुंदी 30 मीटरपर्यंत वाढविण्यात आली. बाजूच्या तलावाचे झिरपणारे पाणी अडविले पाहिजे, यासाठी "इलिप्टीकल' आकाराचे बंधारे पुलाच्या खाली बांधण्यात आले. या बंधाऱ्याला अंदाजे पंधरा लाख रुपये नाममात्र खर्च आला. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार एक क्‍यूसेस पाणी थांबण्यासाठी एक लाख 74 हजार रुपये खर्च येतो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ 15 लाख रुपये खर्च करून 20 क्‍यूसेस पाणी अडविण्यात यश मिळविले आहे. जवळपास साडेसातशे मीटर लांब असे थांबलेले पाणी येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. अनेक जण आता नाल्यात साचलेले पाणी पाहण्यासाठी पर्यटनाचा एक भाग म्हणून येताना दिसत आहेत. कंत्राटदार गोपाल अग्रवाल व अशोक पाटील यांनी या "पूल-कम-बंधाऱ्या'चे काम पूर्णत्वास नेले आहे.

जलसंधारणाचे आदर्श मॉडेल
या बंधाऱ्यामुळे जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. सभोवताल असलेल्या विहिरींची जलपातळी वाढणार आहे. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. वाहत्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास जलक्रांतीत आमूलाग्र बदल होऊ शकतो. हा बंधारा राज्यासाठी आदर्श मॉडेल ठरेल असा विश्‍वास सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com