केम' गैरव्यवहार प्रकरण : शेगाव, पुण्यात झडती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम)मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश चौधरी याला जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी (ता. 23) दिले.

अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम)मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश चौधरी याला जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी (ता. 23) दिले.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वातील एक पथक आज, मंगळवारी गणेश चौधरीला घेऊन चौकशी करण्यासाठी शेगाव व पुण्याकडे रवाना झाले आहे. केम प्रकल्प अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम आणि अकोला या पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यातसुद्धा राबविण्यात आला होता. त्या वेळी अमरावती विभागाची जबाबदारी चौधरी याच्याकडे असताना त्याने पदाचा दुरुपयोग करून रकमेची अफरातफर केल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आली होती. पोलिसांनी चौधरीसह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिकाऱ्यांसह आर्थिक गुन्हे शाखेचे पथक झडती घेण्यासाठी पुणे आणि बुलडाणा जिल्ह्यात आज, मंगळवारी रवाना झाले. ज्या ठिकाणी प्रकल्प राबविला, त्या ठिकाणच्या काही लाभार्थ्यांसोबत किंवा ज्या संस्थेच्या वतीने कामे झाली, अशा लोकांचे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे बयाण तपास यंत्रणेकडून नोंदविले जाईल.
गणेश चौधरी सोमवारी (ता. 23) आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raid in pune and shegaon