या वनपरिक्षेत्रात सर्रास होते सागवानची कत्तल, म्हणून...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

सर्वत्र ताळेबंदी असून, शासकीय अधिकारी व कर्मचारीही घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, या संधीचा फायदा घेत वृक्षाची तस्करी करणाऱ्यांनी फायदा घेतला.

बुलडाणा : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वन विभागाने झाडे लावा-झाडे जगवा ही मोहीम राबविली आहे. मात्र, परिसरातील फर्निचर व्यापारी, रंधा मशिन, सॉ मिल आणि काही वनविभागाचे अधिकारी यांच्यात छुपी मिलिभगत असल्याने वनविभागातील अधिकारी व कर्मचारी फारसे गांभीर्याने लक्ष देत नाही. याचाच प्रत्यय घाटबोरी वनपरिक्षेत्रात आला असून, वनविभागाने बेकायदेशीर रंधा मशिन व सागवान चोरी 28 एप्रिलला सकाळी 5 वाजेदरम्यान पकडल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.

सर्वत्र ताळेबंदी असून, शासकीय अधिकारी व कर्मचारीही घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, या संधीचा फायदा घेत वृक्षाची तस्करी करणाऱ्यांनी फायदा घेतला असून, घाटबोरी वनपरिक्षेत्रात सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाबाबत गोपनीय माहितीच्या आधारावर मंगळवारी (ता.28) अहमद अली यांच्या रंधा मशिनवर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रल्हाद तोंडीलायता, वनपाल श्री. बोबडे, वनरक्षक श्री. देशमुख व एकूण 15 वनकर्मचाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी सदर विनापरवाना सागवान कटसाईज मालाची चौकशी 5 तास चालू असताना माल कटसाईजचा छाननी करत करत साठवून ठेवलेला 0.899 घन मीटर अंदाजे 40 हजाराचा माल व इलेक्ट्रीक रंधा मशिन जप्ती दाखवण्यात आला.

महत्त्वाची बातमी - धक्कादायक : ‘त्या’ कोरोना बाधितांच्या संपर्कात आले 39 पोलिस

वास्तविकता आणि देखावा
वन विभागाने मोठ्या शिताफीने सागवान चोरीबाबत माहिती मिळाल्यानुसार कारवाई केली. परंतु, यादरम्यान, प्राप्त असलेली वनसंपत्ती आणि कारवाईमध्ये दाखविण्यात आलेली वनसंपत्ती यामध्ये चांगलीच तफावत असल्याची चर्चा संपूर्ण मेहकर तालुक्यात चर्चा आहे. याबाबत एसीएफ किंवा डीएफओ यांनी वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी वनप्रेमीकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - काय म्हणता, चक्क सावलीच होणार गायब!

मशिनवर माल आढळून आला
गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोपनीय माहिती मिळाल्यानुसार धाड टाकली असता, सदर मशिनवर माल आढळून आला. परंतु, या ठिकाणी वनविभाग परवाना असलेल्या मालामध्ये बेकायदेशीर 40 हजार रुपयाचा मिळून आल्यामुळे सदर रंधामशिन ताब्यात घेऊन वन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बेकायदेशीर वृक्षतोड संदर्भात माहिती असल्यास वन विभागाला संपर्क करावा त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.
- प्रल्हाद तोंडीलायता, वनपरिक्षेत्र अधिकारी, घाटबोरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on teak theft in Ghatbori forest reserve