पथकाने टाकला छापा अन्‌ हाती आले हे धबाड... वाचाच 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला आहे. त्यामुळे बाजारात विविध कंपन्यांचे वाण विक्रीसाठी दाखल झालेले आहे. शेतामध्ये पेरण्यासाठी कोणत्या कंपनीचे बियाणे घ्यावे, याच द्विधा मनःस्थितीत शेतकरी दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तालुक्‍यामध्ये बोगस बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय झालेले आहे.

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : कोणतीही उगवणक्षमता नसताना विक्रीसाठी आणून ठेवलेल्या बनावटी बोगस बियाण्यांच्या साठ्यावर येथील तालुकास्तरीय गुणनियंत्रक भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. 

खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला आहे. त्यामुळे बाजारात विविध कंपन्यांचे वाण विक्रीसाठी दाखल झालेले आहे. शेतामध्ये पेरण्यासाठी कोणत्या कंपनीचे बियाणे घ्यावे, याच द्विधा मनःस्थितीत शेतकरी दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तालुक्‍यामध्ये बोगस बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय झालेले आहे. मूळचा आंध्र प्रदेशातील पुथ्थापल्ली येथे राहत असलेल्या मोहन बासम नामक व्यक्तीने तीन वर्षांपूर्वी तालुक्‍यातील निलजई येथे 30 एकर शेती मक्‍त्याने घेतलेली. या व्यक्तीने शेतीच्या नावाखाली बोगस बनावटी बियाण्यांची विक्री सुरू केली होती.

अवश्य वाचा- वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू

याबाबत कुणकूण लागताच तालुकास्तरीय गुणनियंत्रक भरारी पथकाने निलजई येथे आपल्या विश्वासू ग्राहकाला पाठवून शहानिशा करून घेतली. याबद्दल खात्री होताच गुरुवारी (ता.4) सकाळी तालुका कृषी अधिकारी गोपाल शेरखाने, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, जमादार श्‍याम मेश्राम, कृषी सहायक, पर्यवेक्षक यांनी मिळून निलजईस्थित शेतामधील गोठ्यात छापा टाकला. यावेळी महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेले "जादू' नामक बनावट कंपनीची पाकिटे आढळून आलीत. सव्वा लाख रुपये किमतीची 172 पाकिटे जप्त करून मोहन बासम याला चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांनी जागृत राहण्याची गरज 

सध्या विविध बोगस कंपन्यांकडून बोगस बियाणे विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे भोळ्याभाबड्या व अशिक्षित शेतकऱ्यांची सहज फसवणूक होत आहे. म्हणून याबाबत शेतकऱ्यांनी जागृत होण्याची गरज आहे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The raid was carried out by the team and Duplicate seeds came out.