रेल्वे बजेटची "सुपरफास्ट' अंमलबजावणी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

नागपूर - रेल्वे अर्थसंकल्पात घोषित अनेक रेल्वेगाड्यांची प्रवाशांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा आहे. यंदा मात्र दुसऱ्या दिवसापासूनच अर्थसंकल्पात घोषित रेल्वेगाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार महाशिवरात्री आणि नर्मदा जयंतीच्या पर्वावर विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत.

नागपूर - रेल्वे अर्थसंकल्पात घोषित अनेक रेल्वेगाड्यांची प्रवाशांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा आहे. यंदा मात्र दुसऱ्या दिवसापासूनच अर्थसंकल्पात घोषित रेल्वेगाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार महाशिवरात्री आणि नर्मदा जयंतीच्या पर्वावर विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत.

ब्रिटिशकालीन स्वतंत्र रेल्वे बजेटची प्रथा मोडीत काढत यंदा सामान्य अर्थसंकल्पातच रेल्वे बजेटचाही अंतर्भाव करण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तीर्थक्षेत्र आणि पर्यटनासाठी रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली. बुधवारी झालेल्या या घोषणेनंतर गुरुवारीच गाड्या चालविण्याचे नियोजनही करण्यात आले. बजेटच्या एवढ्या सुपरफास्ट अंमलबजावणीची ही बहुदा पहिलीच वेळ ठरावी.

महाशिवरात्रीनिमित्त नागपूर ते गोव्यातील मडगावपर्यंत सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहेत. मडगाव-नागपूर विशेष ट्रेन 24 फेब्रुवारी सकाळी 8.30 वाजता तर नागपूर- मडगाव सुपरफास्ट विशेष ट्रेन 25 फेब्रुवारी रोजी रवाना होईल. या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड. चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. नागपूर- लोकमान्य टर्मिनल्स ही रेल्वेगाडी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता नागपूरस्थानकावरून रवाना होईल. याचप्रमाणे 24 फेब्रुवारी रोजी रात्री 12.20 वाजता मुंबई-नागपूर ही रेल्वेगाडी रवाना होईल.

तसेच नर्मदा जयंतीचे औचित्य साधून जबलपूर ते सुकरीमंगेला ही विशेष रेल्वे 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.20 वाजता जबलपूर स्थानकावरून सोडण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एकाचवेळी मोठी गर्दी होते. रेल्वेगाड्यांसह सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये खचाखच गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन तीर्थक्षेत्रासाठी विशेष गाड्या चालविण्यात येत असल्याने प्रवाशांच्या सुविधा होण्यासह रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

Web Title: railway budget superfast enforcement