एकदाचा आला पाऊस गोंदिया जिल्ह्यात आणि शेतकऱ्यांचा जीव पडला भांड्यात

नरेंद्र शिंगामे
गुरुवार, 9 जुलै 2020

गेले दोन दिवस उघडझाप करणाऱ्या पावसाने आज, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजतानंतर गोंदिया शहरासह तालुक्‍यात दमदार हजेरी लावली. टेमनी, बरबसपुरा येथे जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून, रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
 

गोंदिया : शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बरेचसे पावसावरच अवलंबून असते. यंदा मात्र पाऊस अगदी वेळेत आला, त्यामुळे शेतकरी सुखावला होता. मात्र नंतर पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. आणि शेतकरी पावसाच्या वाटेकडे डोळे लाऊन बसले होते.

गेले दोन दिवस उघडझाप करणाऱ्या पावसाने आज, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजतानंतर गोंदिया शहरासह तालुक्‍यात दमदार हजेरी लावली. टेमनी, बरबसपुरा येथे जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून, रोवणीच्या कामाला वेग आला आहे.

गत दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या आठही तालुक्‍यांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर दोन-तीन दिवस सतत ऊन तापत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. रोवणी कशी करावी, असा पेच त्यांच्यासमोर होता. मात्र, कुठे तुरळक तर कुठे दमदार हजेरी लावलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची काही अंशी चिंता मिटविली आहे.

आज, गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कडाक्‍याचे ऊन तापत असताना अचानक साडेदहाच्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून आले. त्यानंतर गोंदिया शहरासह तालुक्‍यात तब्बल तासभर पावसाने दमदार हजेरी लावली. शहरातील सर्व रस्ते जलमय झाले होते. रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली. तालुक्‍यातील टेमनी आणि बरबसपुरा या गावांना पावसाचा तडाखा बसला. सकाळी 11 च्या सुमारास विजेचा कडकडाट आणि वादळवाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेकांच्या घरांवरचे छत उडाले. काहींच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूही पाण्यात भिजल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विद्युत प्रवाह खंडित झाला. शाळांच्या छतावरदेखील झाडे कोसळल्याची माहिती आहे.

सविस्तर वाचा - रागाच्या भरात बापानेच केला मुलाचा खून

अन्य तालुक्‍यांत रिमझिम पाऊस
गोंदिया तालुका वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांत ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस पडला. एकंदरीत या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रोवणीच्या कामांना गती मिळाली आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Gondia district