हिंगोली : शेती नुकसानीच्या पंचनाम्यास पावसाचा अडथळा

मंगेश शेवाळकर
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

जिल्ह्यातील पिक नुकसानीच्या पंचनाम्यांना पावसाचा अडथळा निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे धुवाँधार पावसामुळे शेतांमध्ये पुन्हा एकदा चिखल झाला आहे. त्यामुळे पिक पंचनामा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील पिक नुकसानीच्या पंचनाम्यांना पावसाचा अडथळा निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे धुवाँधार पावसामुळे शेतांमध्ये पुन्हा एकदा चिखल झाला आहे. त्यामुळे पिक पंचनामा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहा:कार उडवून दिला आहे. या पावसामुळे सोयाबीन, कापूस, झेंडू, ज्वारी, तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या नजर पाहणीनुसार जिल्ह्यामध्ये दोन लाख तेरा हजार ७२६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन पिकाचे एक लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले  आहे.

दरम्यान, तसेच कापूस पिकाचे सुमारे ३९ हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फुटले असून, ज्वारी उभी असतानाच कणसांना कोंब फुटू लागली आहेत. जिल्हा प्रशासनाने 707 गावांमध्ये नुकसान झाल्याचे सांगितले. जिल्ह्यामध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून तीन दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.

शनिवार (ता. २ नोव्हेंबर) रोजी पहाटे पर्यंत एकूण सरासरी २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये हिंगोली मंडळात ४० मिलिमीटर, खांबाळा ५०, माळहिवरा २९, सिरसम बुद्रुक सोळा, बासंबा २८, नरसी नामदेव २१, डिग्रस कऱ्हाळे पंधरा, कळमनुरी २९, नांदापूर अठरा, आखाडा बाळापुर ४८, डोंगरकडा दहा, वारंगा फाटा चाळीस, वाकोडी सोळा, सेनगाव सोळा, गोरेगाव 31, आजेगाव सतरा, साखरा बावीस, पानकनेरगाव आठरा, हत्ता सात, वसमत पाच सहा, गिरगाव नऊ ,कुरुंदा सात, टेंभुर्णी पाच, आंबा सोळा, हायातनगर दोन औंढानागनाथ 33, जवळाबाजार दहा, येहळेगाव 25 तर साळणा मंडळांमध्ये पस्तीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात झालेल्या या पावसामुळे शेतामध्ये पुन्हा एकदा पाणी साचले असून सोयाबीन व इतर पिकांच्या नुकसानी मध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र आता पंचनामे करण्यासाठी या पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पंचनाम्या साठी पुढील काही दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall barrier during Panchanama in hingoli district