वर्षाच्या सुरुवातीला पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

बोर्डी परिसरामध्ये फळपीक उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अतिवृष्टीने पूर्वीच संत्रा व केळी पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी झालेल्या गारपीटीने संत्रा व केळी पिकांचेही नुकसान झाल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.

अकोला :  मागील वर्षी पावसाने शेतकऱ्याची साथ सोडली नाही. तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अकोट व तेल्हारा तालुक्याला पावसाचा फटका बसला आहे. बोर्डी परिसरात गारपीट झाल्याने येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दानापूर व हिवरखेड शिवारातील कपाशीवर संकट कोसळले आहे.

हेही वाचा - ... अन् निष्ठावंतांंची निष्ठा खुंटीला!

संत्रा पिकांचेही नुकसान
गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने परिसरात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. खरीप हंगाम तर अतिवृष्टीने हातातून गेलाच आहे. परंतु, अवकाळी पावसाने रब्बीची पिकेही धोक्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्‍ये अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. यामुळे शेतातील हरभरा पिकांवर कीड रोगांचा प्रादूर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंचेचे ढग दाटून येत आहेत. बुधवारी (ता.१) रात्री झालेल्या गारपीटीने हरभरा, तूर आणि गव्हाच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. बोर्डी परिसरामध्ये फळपिक उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अतिवृष्टीने पूर्वीच संत्रा व केळी पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी झालेल्या गारपीटीने संत्रा व केळी पिकांचेही नुकसान झाल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.

क्लिक करा - मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना खासदारांचीच नाराजी!

हिवाळा की, पावसाळा!
हवामान विभागाने विदर्भात तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता दर्शवली होती. हिवरखेड परिसरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वरुणराजाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाल्याची चर्चा सुद्धा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. गेल्यावर्षी अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांची पिके उध्वस्त केली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला होता. मागील काही दिवसात हिवरखेड परिसरात थंडीचा जोर वाढला असून, तापमान प्रचंड घटले आहे. थंडी आणि पाऊस एकत्र सुरू असल्याने थंडीच्या उबदार कपड्यांसह पेटीत ठेवलेले रेनकोट आणि छत्र्या सुद्धा बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. वातावरणातील वेगवेगळ्या बदलांमुळे सध्या हिवाळा सुरू आहे की पावसाळा हे सुद्धा कळेनासे झाले आहे. 

भाजीपाला उत्पादकही संकटात
दानापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. व बुधवारी रात्री परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये हरभरा पिके नेस्तनाबूत होत असल्याचे चित्र पाहवयास मिळले आहे. त्याचबरोबर काढणीला आलेली तुरही आता संकटात सापडली आहे. भाजीपाला पिकांवरही मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी परत एकदा संकटात सापडला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall falls early in the year